लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात मॉन्सूनचे लवकर आगमन झाले असले, तरी त्याचा अनुभव मात्र पुणेकरांना एकच दिवस आला होता. त्यानंतर पाऊस केवळ हुलकावणी देत होता. गुरुवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला.
गेले काही दिवस शहरात आकाश ढगाळ असायचे. एखादीदुसरी सर येऊन जात असे. मात्र, पाऊस म्हणावा असा पडत नव्हता. मात्र, आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. प्रथमच यंदा पुणेकरांची सकाळ पावसाळी वातावरणाने झाली होती. आता पाऊस थांबला, असे वाटत असतानाच अचानक एखादी जोरदार सर येऊन जात होती. शाळा, कॉलेजेस बंद असल्याने रस्त्यावरील गर्दी तशी कमी होती. पावसामुळे एरवी दुचाकीवरून जाणाऱ्यांनीही आपल्या मोटारी बाहेर काढल्याने रस्त्यावरील मोटारींच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत होती. त्यामुळे शहरातील काही चौकांमध्ये वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येत होते.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ११ मिमी, तर लोहगाव येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही शहरात अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगरला १३.१ आणि लोहगावला ९.६ मिमी पावसाची नोंद झाली. अक्षय मेजरमेंटनुसार, रात्री ९ वाजेपर्यंत कात्रज आंबेगाव २१, सिंहगड रोड- खडकवासला २६, वारजे ११.२, कोथरुड १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी शहरात आकाश ढगाळ राहून मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.