पुणे : गेल्या १२२ वर्षांनंतरचा सर्वांत प्रखर उन्हाळा केव्हा संपेल, याची मोठी प्रतीक्षा असलेल्या देशवासियांसाठी व मॉन्सूनकडे डोळे लावून बसलेल्या शेतक-यांसाठी एक मोठी बातमी. नैऋत्य मॉन्सून अखेर येत्या २७ मे रोजी केरळमध्ये धडकणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज जाहीर केले. केरळनंतरचा त्याचा महाराष्ट्रातील प्रवास सध्यातरी विनाअडथळा दिसत असून तो १ जूनच्या आसपास राज्यात हजेरी लावेल, असा अंदाज असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. त्यामुळे शेतक-यांनो आता खरिपाच्या तयारीला लागा, असेही त्यांनी सांगितले.
मॉन्सूनच्या आगमनसाठी सध्या अरबी समुद्रात अनुकुल वातावरण तयार झाले असून १५ मेपर्यंत तो अंदमानच्या समुद्रात येण्याचा अंदाज आहे. मॉन्सून येथे दाखल होण्याची सरासरी तारीख २२ मे असून तो साधारणपणे सात दिवस अंदमानात लवकर दाखल होत आहे. त्यानंतर त्याचा प्रवास भारताच्या मुख्य भुमीकडे होणार आहे. मॉन्सून हा साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र, विभागाने तयार केलेल्या मॉडेलच्या आधारे तो आता २७ मे रोजी दाखल होत आहे. मात्र, त्यात चार दिवस कमी अधिक होऊ शकतात. विभागाने जारी केलेल्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार २० ते २२ मेच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वाढली आहे. मात्र, या काळात आलेला किंवा त्यानंतर आलेला पाऊस याचा मॉन्सूनशी संबंध नसल्याचेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “विभागाने यापू्र्वी दिलेल्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच दुस-या टप्प्याचा अंदाज मेच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यात सबंध देशात पावसाचे वितरण कसे असेल, मध्य भारतात तो कसा पडेल, जून व जुलैमध्ये त्याचे वितरण कसे असेल, याचा समावेश असेल. याचा फायदा शेतक-यांना होईल.”
विना अडथळा प्रवास
राज्यात साधारणपणे मॉन्सून ७ किंवा ८ जून रोजी तळकोकणात दाखल होतो. पण यंदा २७ मे रोजी तो केरळमध्ये दाखल होत असल्यास तो त्यापूर्वी महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. मात्र, तो उत्तरेकडे सरकताना त्याचा वेग मंदावतो. कधीकधी तो कर्नाटक, गोव्यापर्यंत येऊन तो थांबतो. त्यामुळे महाराष्ट्रात दाखल होण्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याच्या महाराष्ट्राच्या प्रवासात सध्यातरी कोणतेही अडथळे दिसत नाहीत. त्यामुळे तो किमान सहा दिवस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात अवकाळीची शक्यता
विभागाने मे महिन्याच्या दिलेल्या अंदाजानुसार देशात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंतच्या १२ ते १३ दिवसामध्ये तसा पाऊस झालेला नाही. दक्षिणेकडील राज्यामध्ये मात्र, तो जोरदार कोसळला आहे. मे महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात राज्याच्या कोकण, दक्षिण महाराष्ट्रात तो पडण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम पूर्व मॉन्सूनवर
सध्या देशात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा म़ॉन्सूनपूर्व पावसावर झाला का, असे विचारला असता ते म्हणाले, “त्याचा परिणाम उत्तर भारतात दिसून आला आहे. या लाटेमुळे पश्चिमी वारे यंदा कोरडे आले. त्यामुळे पाऊस पडला नाही. त्यामुळे या भागातील गव्हाच्या उत्पादनाला फटका बसला. महाराष्ट्रात असा परिणाम झालेला नाही.”
खरिपाच्या तयारीला लागा
विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार आता राज्यातील शेतक-यांनी आता शेतीची कामे सुरू करण्यास हरकत नाही. खरिपाची तयारी सुरू करावी. पावसाचा प्रवास हा नैसर्गिक असला तरी मॉन्सून लवकर येणार आहे, हे मात्र, खरे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.वर्ष आगमनाचा अंदाज प्रत्यक्ष आगमन
२०१७ ३० मे ३० मे२०१८ २९ मे २९ मे
२०१९ ६ जून ८ जून२०२० ५ जून १ जून
२०२१ ३ जून ३१ मे