पुणे : पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाखांना चुना लावल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. १८ लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो असे सांगून फसवणूक केल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हा प्रकार घडला. अधिक पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. बाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सल शाळेशेजारी असलेल्या एका बंगल्यामध्ये एक ढोंगी बाबा पूजा मांडून बसला होता. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाख रुपये भरा, त्याचे तुम्हाला ५ कोटी रुपये करून देतो असे सांगितले.
तक्रारदारांनी १८ लाख रुपये दिल्यावर तोतया पोलिसांचे पथक तेथे आले आणि ते १८ लाख रुपये व ढोंगी बाबाला घेऊन गेले. त्यानंतर ते पोलिस तोतया आल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे करत आहेत.