इंदापूर : तालुक्यातील उजनी जलाशयात मच्छीमारी करणाऱ्या बाभुळगाव येथील मच्छीमारांना जाळ्यात दुर्मिळ व औषधी गुणधर्म असणारा साडेसहा किलो वजनाचा ‘आहेर’ मासा सापडला आहे. या माशाला इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोन हजार रुपयेप्रमाणे तेरा हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला.
बाभुळगाव येथील मच्छीमार बाबा मोरे, अमित कावरे, बापू माने यांनी उजनी जलाशयात मासेमारीसाठी जाळे लावल्यानंतर त्यांना रविवार (दि. ६) सकाळी हा आहेर मासा जाळ्यात सापडल्यानंतर सकाळी ११ वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारात विक्रीसाठी घेऊन आले होते. बाजारात सचिन जाडकर यांच्या आडतीवर तो मासा विक्रीस ठेवण्यात आल्यानंतर या दुर्मिळ व औषधी गुणधर्म असणारा हा मासा विकत घेण्यासाठी अनेक मासे व्यापाºयांनी चढाओढीने बोली लावल्याने, लिलावामध्ये या माशाला तेरा हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. या आहेर माशाच्या कातडीवर जमा होणाºया स्रावात औषधी गुणधर्म असतात. ते स्राव रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात. उजनी जलाशयात वेगवेगळ्या जातींचे ३० प्रकारचे मासे आढळतात, मात्र, जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात हेळसांड झाल्याने व चिलापी माशांच्या आक्रमणामुळे पूर्वी जे कटला, मरळ, रहू, शिंगाडा, चांभारी, वाम्ब हे मुबलक प्रमाणात मिळणारे मासे सध्या कमी मिळत आहेत. आहेर माशाच्या औषधी गुणधर्मामुळे या माशाला देशातच नव्हे तर परदेशातही मागणी आहे. या वेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे व संचालक मंडळाने मासेमारी व्यवसाय करणाºयांना तरुणांचे कौतुक केले आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सचिव जीवन फडतरे यावेळी उपस्थित होते.