लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बदलत्या काळात तरुणींसह पालकांच्या वराबाबतच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. तरुण उच्चशिक्षितच असावा, त्याचं पुण्या-मुंबईत स्वत:चं घर असावं, तो आर्थिक स्थैर्य देणारा असावा...हे सर्व त्यांना तरुणाकडे वयाच्या पंचविसाव्या वर्षी हवं असतं. सगळं जर असं झटपट हवं असेल तर तुम्हीच मुलीला सर्व घेऊन द्या..आमची काही हरकत नाही...आम्हाला हुंडा नकोच, पण मुलगी सासरी सुखी राहाण्यासाठी तिचे आईवडील तिला अनेक गोष्टी देत असतील तर आम्ही देखील ‘नाही’ कशाला म्हणू? परंतु मग त्याला ‘हुंडा’ असे म्हणता कामा नये, अशी मते लग्नाच्या बोहल्यावरील तरुण व्यक्त करतात.
एकविसाव्या शतकात ‘हुंडा’ या शब्दाची व्याख्याच बदलली आहे. तरुणाला लग्न साधेपणाने हवं असतं, पण आमची मुलगी एकुलती एक असल्याने आम्हाला लग्न धूमधडाक्यातच करायचं आहे असा आग्रह धरला जातो. केवळ प्रतिष्ठेपायी मुलीकडच्यांकडून लग्नात अवास्तव खर्च केला जातो. मुलीच्या प्रेमापोटी सर्वांना महागड्या वस्तू दिल्या जातात, मग चूक नक्की कुणाची?
मग देताय तर द्या, आम्हीही घ्यायला तयार आहोत...यात आमचं काय चुकलं? असा सवाल तरुणांनी उपस्थित केला आहे. एकीकडे ही जरी तरुणाईची मते असली तरी माहेरहून नवीन व्यवसाय करण्यासाठी पैसे आण, चारचाकीच हवी...अशा एक ना एक असंख्य मागण्या वाढायला लागतात. सततच्या सासरकडच्यांच्या मागण्यांमुळे मुलींना आपली जीवनयात्रा संपवण्याची वेळ येते. यामध्ये उच्चशिक्षित महिलादेखील मागे नाहीत. ही वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही, असे तरुणींचे म्हणणे आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मी गेल्या दोन वर्षांपासून मुली पाहात आहे. आम्ही कधीही हुंडा मागितलेला नाही आणि मागणार देखील नाही. पण मुलीसह तिच्या पालकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षांचे काय? ते स्वत: कोणतीही तडजोड करायला तयार होत नाहीत. मग नवरा देऊ शकत नसला की स्वत: मुलीला महागड्या वस्तू खरेदी करून दिल्या जातात. तुम्हा दोघांना देत आहे असे वरून म्हटले जाते. मुलीची हौस पुरवण्यासाठी सर्व केलं जातं. याला हुंडा म्हणायचे का?- रोहन काळे, नोकरदार
------
हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण असा हुंडा कुणी थेट मागत नाही. पैसे कमी पडत आहेत, जरा आईवडिलांकडून घेऊन ये. असं म्हणत ते वाढत जातं. मी स्वत: हुंडा देण्याच्या विरोधात आहे. नवऱ्याकडे जे असेल त्यात भागवायला मी तयार आहे किंवा आम्ही दोघे मिळून देखील घेऊ शकतो.
- सानिका थोरात, नोकरदार
चौकट
हुंडा प्रतिबंधक कायदा अधिनियम १९६१ कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. हुंडा मागणे हा गुन्हा असून त्यासाठी ६ महिन्यांपर्यंतची कैद आणि १० हजार दंडाची शिक्षा आहे. लग्नानंतर सात वर्षांच्या आत वधू असामान्य परिस्थितीत मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरण्याआधी तिला हुंड्यासाठी प्रवृत केले जात होते. यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३०४ बीच्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.
चौकट
२०२० मध्ये विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देण्यासंबंधी १५६ गुन्हे दाखल झाले होते. यंदा त्यात वाढ झाली आहे. यंदाच्या ऑगस्ट महिनाअखेर विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देण्यासंबंधी १८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुलैमध्ये हेच प्रमाण १६१ इतके होते.