अंकुश जगताप ल्ल पिंपरी
सकाळ होताच खडतर रस्ता, वाहनांची प्रचंड वर्दळ, त्यामधून तीनचाकी हातसायकल चालविणारा एक तरुण सर्वाचे लक्ष वेधून घेतो. दुस:याच्या चुकीमुळे कमरेपासून पायाकडचा भाग निकामी होऊन आलेल्या शारीरिक अपंगत्वावर त्याने बुद्धिचातुर्याने मात करून जगातील ज्ञानाची कवाडे खुली करण्यास नियतीलाही भाग पाडले आहे. हिंजवडी येथील आयटी कंपनीत कार्यरत असलले संगणक अभियंता दिनेश परमार यांचा संघर्षमय प्रवास धडधाकट असणा:यांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
दिनेश हे मूळचे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वडवान गावचे रहिवासी. वयाच्या पहिल्या वर्षी ताप आला असताना आई-वडिलांनी त्यांना दवाखान्यात नेले. तेथे दिल्या गेलेल्या लशीचा दुष्परिणाम झाल्याने त्यांचा कमरेपासून पायाचा भाग निकामी झाला. कायमचे अपंगत्व वाटय़ाला आले. नकळत्या वयात त्यांचे बालपणच हिरावले गेले. घरी आई, वडील, धाकटा भाऊ, बहीण असा परिवार आहे. गावातच शालेय शिक्षण पूर्ण करून उत्तर गुजरातच्या एम. चंद्राचार्य महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेतले. घरातील मोठा भाऊ म्हणून जबाबदारी पेलण्याची तयारी ठेवून कामाच्या शोधात असतानाच 3 महिन्यांपूर्वी इंटरनेटवर झळकलेली नोकरभरतीची जाहिरात त्यांनी पाहिली. त्यानुसार हिंजवडी येथील केपीआयटी या कंपनीत अर्ज केला व संगणक अभियंता म्हणून नोकरीही मिळविली. सध्या ते मारुंजी गावात भाडय़ाने घेतलेल्या सदनिकेत वास्तव्यास आहेत. दिनेश हे हिंजवडी येथील टप्पा क्र. 1मध्ये असलेल्या कंपनीत नोकरीसाठी तीनचाकी सायकलवरून जातात. कार्यतत्परता, तसेच जिद्दीच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी कंपनीतील सर्वाची मने जिंकून घेतली आहेत. त्यांच्या या जिद्दीचा प्रवास धडधाकट असणा:या, पण स्वत: नैराश्याच्या गर्तेत वावरणा:या अनेकांसाठी प्रेरणादायी असाच म्हणावा लागेल.
कोणामुळे नुकसान झाले यापेक्षा आपणास मनुष्यजन्म मिळालाय, हेच भाग्याचे आहे. स्वत:च्या कमीपणावर बोट ठेवून आयुष्याचा मार्ग खुंटवण्यात काय अर्थ आहे ? माणूस म्हणून मिळालेल्या बुद्धिकौशल्यावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने काम केल्यास आयुष्यात काहीच अशक्य नाही.
- दिनेश परमार, संगणक अभियंता