इन्ट्रो
जिल्हाधिकारी किंवा भारतीय परराष्ट्र सेवेतच जायचे हा दृढनिश्चय प्रथम केला. हे विशिष्ट ध्येय घेऊन ते पूर्ण करण्यासाठी झपाटलेपणाने सातत्यापूर्ण अभ्यास करत राहणे. हाच ध्यास घेऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील दिग्विजय पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत केवळ दुसऱ्याच प्रयत्नात संपूर्ण देशात १३४ वी रँक मिळवली. त्यात त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली. सध्या ते भारताचा रशियामध्ये असलेल्या दूतावास म्हणजे मॉस्कोमध्ये आर्थिक आणि वाणिज्यक उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या दिग्विजय पाटील यांची वृत्ती पहिल्यापासूनच सृजनशील होती. भरपूर वाचन, विविध प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणे, पोहणे, रेखाटन, कविता करणे, ऑनलाइन ब्लॉगिंग करणे आदी छंद त्यांनी अभ्यासाबरोबरच जोपासले होते. यासाठी वडील डॉ. संजय पाटील यांचा प्रथमपासून भक्कम पाठिंबा असल्याने त्यांना उज्ज्वल यश मिळवता आले. २०१६ साली कॉलेज शिक्षण पूर्ण झाले. शेवटच्या सत्रामध्ये त्यांनी यूपीएससीची तयारी चालू केली होती. कॉलेजनंतर १ वर्ष अभ्यास करून, २०१७ ला यूपीएससीचा पहिला प्रयत्न दिला. त्यात पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे पार करत संपूर्ण देशात ४८२ वी रँक त्यांना मिळाली. त्यावर्षी त्यांची इंडियन पोस्टल सेवेत निवड झाली होती. तर सेवेत असतानाच त्यांनी अभ्यास करत दुसरा प्रयत्न दिला. त्यात देशात १३४ वी रँक आली.
नवीन विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?
अभ्यासक्रम पहिल्यांदा यूपीएससी संकेतस्थळावरून डाऊनलोड करून तो नीट समजून घ्या. रोज वर्तमानपत्र वाचत असताना प्रत्येक बातमी अभ्यासक्रमातील कोणत्या भागाशी निगडित आहे ते विचार करा. त्यामुळे परीक्षेचा दृष्टिकोन वाढेल आणि डोक्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आणि मानसिक आराखडा तयार होईल. वैकल्पिक विषय कोणता घ्यावा, यावर नीट विचार करा. तो निवडताना त्याचा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन पेपरसोबत किती संलग्न आहे. त्यात मागच्या ५-६ वर्षांपासून किती गुण येताहेत, तसेच स्वत:ला त्या विषयात किती आवड अन् गती आहे. पुढील २-३ वर्षे आपण त्यात आवड टिकवू शकू का? या प्रश्नांची उत्तरे शोधल्यावरच तुम्ही वैकल्पिक विषय निवडा. कोचिंग जरी घेत नसाल, तरी कोचिंग संस्थेचे अभ्यास साहित्य बाजारात उपलब्ध असतात. कोचिंगचा विरोध याचा अर्थ त्यांनी बनवलेल्या चांगल्या अभ्यास साहित्याला विरोध असा होत नाही. मी सामान्य अध्ययनसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. मात्र, जेव्हा उपयोगी वाटले त्यावेळी कोचिंगचे अभ्यास साहित्य हे स्वतःची मेहनत आणि वेळ वाचवण्यासाठी वापरले आहे. पूर्वपरीक्षेपूर्वी २०१३ पासूनचे मागील वर्षाचे पेपर सोडवा आणि त्यानंतर चांगल्या संस्थांनी बनवलेले कमीत कमी ३५-४० सरावसंच सोडवा. यूपीएससी परीक्षेचे स्वरूप हे इतर परीक्षांपेक्षा वेगळे आहे. बऱ्याच वेळा हा निर्णय हा अनपेक्षित असतो. त्यामुळे यश येण्यास उशीर होऊ शकतो. अशा काळात पालकांनी मुलांवरील विश्वास ढळू देऊ नये. अपयशानंतर खच्चीकरण झालेल्या विद्यार्थ्याला कसे पुन्हा बळ देता येईल याची जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी, असे दिग्विजय पाटील सांगतात.
(फोटो : दिग्विजय पाटील आयएफएस या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)