‘ब्रेक द चेन’ अंतर्गत करण्यात आलेले लॉकडाऊन आज सकाळी संपले आहे. त्यानंतर बारामतीत केवळ दुकाने बंद आहेत. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी शहरात चांगलीच गर्दी झाली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात प्रचंड नाराजी आहे. दुकाने बंद ठेवल्याने कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, रस्त्यावर बिनकामाच्या येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. बंद ठेवलेल्या व्यावसायिकांना कर, सेवक पगार, वीजबिल, बँक हफ्ता चुकणार नाही. त्यामुळे हे देणे भागवणार कसे, या चिंतेत व्यापारीवर्ग दिसून येतो.
बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या बंदमुळे व्यापारीवर्गाचे ऐन सणासुदीच्या काळात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. केवळ कापड,चप्पल बुट,मोबाईल,इलेक्ट्रॉनिक्स,वाहन शोरुमसह अन्य काही दुकाने बंद आहेत. नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी आहे. ही बाब प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या निदर्शनास आणली आहे. मागील वर्षी देखील याच काळात दुकाने बंद होती.पुन्हा या वर्षी देखील व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे.शासन पुन्हा येत्या काही दिवसांत लॉकडाऊन करणार असल्याचे समजते.त्यामुळे शासनाने आम्हाला लॉकडाऊन करण्यापूर्वी तीन चार दिवस अगोदर दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गुजराथी यांनी केली आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत ठेवलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या भीतीने बाजारात ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र आहे. आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कलिंगड,खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात या उन्हाळी फळांना असणारी मागणी घटली आहे. काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून शेतीच्या बांधावर शेतमालाची विक्री सुरू केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील; तसेच बागेतील फळे, भाजीपाल्याला मागणीअभावी कवडीमोल भावात व्यापारीवर्गाने मागणी केल्याचे चित्र आहे. अनेकांनी या शेतमालाकडे पाठ फिरविली आहे.
तालुक्यातील प्रल्हाद वरे या शेतकऱ्याने सोशल मीडियावर त्यांच्या उत्पादनांची माहिती शेअर केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतातील कलिंगड, टरबूज विक्रीसाठी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच कोरोनामळे वाहतक बंद, मार्केट बंद आहे. ग्राहक कोरोनाच्या भीतीमुळे मालाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. वरे यांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच मोबाईलद्वारे ग्राहकांना त्यांच्या तयार मालाची माहिती दिली.ग्राहकदेखील त्यास चांगला प्रतिसाद देत आहेत. त्या निमित्ताने 'शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना यशस्वी ठरली. ग्राहकांना योग्य दरात शेतातील ताजा माल मिळाला, तर शेतकन्यांना देखील रास्त दर मिळाला. वरे यांनी सध्या त्यांच्या मळद येथीज शेतालगतच कलिंगड, खरबुजाची विक्री सुरु केली आहे.
‘लोकमत’शी बोलताना वरे म्हणाले, यंदा बाजारपेठ बंद होणार याबाबत सर्व शेतकरी अनभिज्ञ होते. कलींगड आदी उन्हाळी फळांना ४० ते ४५ रुपये प्रतिकीलो दर मिळण्याची शेतकºयांना आशा होती.मात्र, शहरातील बाजारपेठ बंद असल्याने अगदी २० ते २५ रुपये किलो दराने मागणी होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे.