अशोकनगर येथील निर्मल सोसायटी हा परिसर आजूबाजूच्या दाट रस्त्यांच्या मधोमध आहे. म्हाडा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या या सोसायटीमधील ड्रेनेजवाहिन्या जुन्या व नादुरुस्त झालेल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसह क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनदेखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील वीस दिवसांपासून सोसायटीच्या आवारात ड्रेनेजचे सांडपाणी साचलेले होते. नगरसेवकांच्या कार्यालयात वारंवार जाऊनदेखील समस्या सुटत नव्हती. सोसायटीतील नागरिकांनी ही बाब येरवडा नागरिक कृती समितीचे सदस्य शैलेश राजगुरू व मनोज शेट्टी यांना कळवली. मंगळवारी सकाळी या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाचे अभियंता येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त विजय लांडगे यांना याचा जाब विचारला.
अशोकनगर येथील निर्मल सोसायटी परिसरातील ड्रेनेजवाहिन्या तुमची तक्रार मागील आठ दिवसांपूर्वी प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी जेटिंग मशीन पोहोचण्यात अडचणी येत होत्या. सदर ठिकाणी असणाऱ्या ड्रेनेजवाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. मुख्य ड्रेनेजवाहिन्यांसोबत योग्य प्रकारे न जोडल्यामुळे तसेच ड्रेनेजवाहिन्यांवरच नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे दुरुस्तीसाठी अडचणी येत आहेत.
फोटो ओळ
तब्बल २१ दिवसांनंतर अशोकनगर येथील निर्मल हौसिंग सोसायटी आवारातील तुंबलेल्या मैलापाणी वाहिन्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली.