चोरांना पाहून पोलिसांनीच पळून जाणे दुर्दैवी : उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:48 PM2021-01-08T17:48:08+5:302021-01-08T17:48:32+5:30
पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली..
पिंपरी : पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली. हा केविलवाणा प्रकार आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते हे दुर्दैवी आहे. याचा इतर पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होतो. अशा पोलिसांच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणाची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चिंचवड येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, पोलिसांचे मनोबल उंचावले पाहिजे. हातात केवळ काठी असतानाही तुकाराम ओंबळे या पोलिसाने दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले. अशा शहीद ओंबळेंचा वारसा महाराष्ट्र पोलीस दलाला आहे. जागतिक पातळीवर राज्य पोलीस दलाचा लाैकिक आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला साजेशी कामगिरी करावी. पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे तर गुन्हेगारांवर असावा. त्यांच्याकडे नागरिक विश्वासाने आले पाहिजेत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता पोलिसांनी केली पाहिजे. प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, असे विश्वासाचे वातावरण निर्माण करावे.
राज्यातील पोलीस दर काळानुरुप बदलत आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यावर सरकारचा भर आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात २५० कोटींची निवदा काढून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मोठी भरती करण्यात येऊन पोलिसांची अनेक पदे भरण्यात येतील.
पोलिसांच्या निष्ठा व कर्तव्याला तोड नाही
गेले वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. हे वर्ष कोरोनामुक्तीचे असेल. कोरोना महामारीच्या सुरवातीच्या टप्प्यातही पोलिसांनी जोखीम पत्करून रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावले. अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. काहींनी जिवाची पर्वा न करता सेवा केली. त्यामुळे पोलिसांच्या निष्ठा व कर्तव्याला तोड नाही. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम, असे अजित पवार म्हणाले.