मयूर गलांडे
मुंबई - गावाकडं शेतात राबणाऱ्या आई-बापाचं स्वप्न म्हणजे पोराला सरकारी नोकरी मिळावी, त्यानं साहेब व्हावं आणि आपल्या घराण्याचं नाव काढावं. म्हणजे, गावात ताठ मानेनं जगात येत, अभिमानानं चालता येतं. आई-वडिलांसह गावाला अन् मित्रपरिवालाही अभिमान वाटावा, अशा नोकरीत रुजू झाल्यानंतर सचिनकुमारने गावी भेट दिली. खांद्यावर स्टार, डोक्यावर खाकी टोपी अन् हातात पोलीस इन्स्पेक्टरची काठी असलेला लेक पाहून आईचा आनंद गगनात मावेना. तर, तूच माझी प्रेरणा-तूच माझी शक्ती म्हणत आईच्या डोक्यावर पीएसआयची टोपी ठेवणाऱ्या मुलालाही कष्टाचं चीज झाल्याचा अत्यानंद झाला.
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी या छोट्याशा खेडेगावातील सचिनकुमार तरडे यांनी गेल्या 7-8 वर्षांच्या संघर्षातून मिळवलेल्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर प्रथमच गाव गाठलं. आपल्या लेकाला फौजदारकीच्या रुबाबदार पेहरावात पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना. तर, गावकऱ्यांनाही भूमिपुत्राचा अभिमान वाटला, मित्रपरिवारानेही स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमिमुळे आई-वडिलांना ट्रेंनिगच्याठिकाणी ऑर्डर स्विकारतानाच्या कार्यक्रमाला नेता आलं नाही, याची खंत सचिनकुमार यांनी बोलून दाखवली. पण, गावच्या घरातच छोटेखानी कार्यक्रमात मोठा आनंद मिळाला, त्याच आईच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कष्टाचं जीझ झालं, अशी भावनाही त्यांनी सचिनकुमार यांनी व्यक्त केली.
सचिनकुमार तरडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पीएसआय पदी रुजू झाल्यानंतर आईच्या पहिल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी, आपल्या डोक्यावरील पीएसआयची टोपी त्यांनी आईच्या डोक्यावर ठेवली, तर हातातील छडीही आईच्या हाती दिली. यावेळी, आईच्या खुललेला चेहरा अन् उमटलेलं हास्य अवर्णनीय असेच म्हणावे लागेल. सचिन यांनी या फोटोला 'कष्टाचं चीज झालं', असं कॅप्शनही दिलंय. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्विटरवरही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अभिमानास्पद... अभिनंदन... साहेब, गरिबांची सेवा करा... अशा अनेक कमेंट्स या फोटोला मिळाल्या आहेत.
एमपीएससी परीक्षेतून पुणे शहर PSI पदी रुजू
सचिनकुमार तरडे हे मूळ सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी या गावचे रहिवाशी आहेत. सचिन यांचे आई-वडिल आजही गावात शेतीच करतात. शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांनी शेतात काबाड-कष्ट करुन मुलाला उच्च शिक्षण दिलं. मुलानेही त्यांचा विश्वास सार्थक करुन दाखवत एमपीएससी परीक्षेतून पीएसआय पदाला गवसणी घातली. MPSC च्या अंतिम निकालानंतर 15 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण करुन ते 30 मार्च रोजी पुणे शहर पोलीस ठाण्यात पीएसआयपदी रुजू झाले आहेत.
सोलापूरच्या कचरेवाडीचा साहेब लेक
सचिनकुमार यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण माळशिरस तालुक्यातील सदाशिवराव माने विद्यालयातून घेतले. त्यानंतर, माळशिरस येथील गोपाळराव देवक प्रशालेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तर, पुणे येथून बीएची पदवी पूर्ण केली. याच काळात एमपीएससी परीक्षेसाठीही त्यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. एकीकडे अर्थशास्त्र विषयात एमए पूर्ण करतानाच दुसरीकडे स्पर्धा परीक्षेवरही जोर दिला. त्यात, 2017 साली त्यांनी पीएसआय पदासाठी पूर्वपरीक्षा दिली.
ज्या गावी शिकलो, तिथंच सेवेची प्रथम संधी
स्पर्धा परीक्षांचं माहेरघर असलेल्या पुणे शहरातच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सचिनकुमार यांनी स्पर्धा परीक्षा दिली. सन 2017 मध्ये पीएसआय पदाची पूर्व परीक्षा दिल्यानंतर, 20 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्य परीक्षा आणि शारीरीक चाचणी दिली होती. पीएसआय परीक्षेचा निकाल 8 मार्च 2019 रोजी लागला. त्यानंतर, 7 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी, नाशिक येथे 15 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण केले. आपलं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर, स्पर्धा परीक्षेच्या काळात ज्या शहरात शिकलो, पोटाला चिमटे दिले, धडपड केली, त्याच पुणे शहराची सेवा करण्याचं भाग्य लाभल्याचं पीएसआय सचिनुकमार तरडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.