पुणे : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चौकाचौकात पोलीस तैनात आहेत. ते मास्क जरा जरी नाकाखाली आलेला दिसला तरी त्याला पकडून ५०० रुपये वसुल करत आहेत असे असताना शहरात एकाच दिवशी तिघांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार घडले. एका ५५ महिलेच्या डोक्यात मारुन तिला जखमी करुन दीड तोळ्याची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रयत्न झाला.
लोहगाव येथील एका ५५ वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात लोहगावमधील निंबाळकरनगर येथून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दुकानातून दुध घेऊन पायी घरी जात होत्या.श्रम साफल्य इमारतीसमोर एका जण दुचाकी घेऊन थांबला होता. त्या त्याच्यासमोरुन जात असतानाच त्याने फिर्यादींना धक्का देऊन खाली पाडले. बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेने जखमी असतानाही त्याला प्रतिकार करीत आरडा ओरडा सुरु केला. त्यामुळे आजू बाजूच्या लोकांचे त्याकडे लक्ष गेल्याचे पाहून चोरटा दुचाकीवरुन पळून गेला.
दुसरी घटना शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. शुक्रवार पेठेतील ५२ वर्षांच्या महिला प्रभात फेरी मारुन पायी घरी जात होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण हिसका मारुन चोरुन नेले.
महाविद्यालयीन तरुणाला लुटलेसेनापती बापट रोडवरील सिम्बॉयोसिस कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका २० वर्षाच्या विद्याथ्याला दोघा दुचाकीवरील तरुणाने लुबाडले. हा विद्यार्थी मंगळवारी रात्री ८ वाजता डेक्कन जिमखाना गेटच्या जवळ वॉकिंग करत असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्याच्या हातातील ३० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.