लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उन्हाळ्यात घरात उकडत असल्याने मोकळ्या जागेत उशाखाली १ लाख ५ हजार रुपये ठेवून झोपणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. ते झोपले असताना चोरट्यांनी उशाखाली ठेवलेली रक्कम चोरुन नेली.
याप्रकरणी पांडु खटरावत (वय ४५, रा. टिळेकरनगर, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ६ एप्रिलच्या रात्री ते ७ एप्रिलच्या पहाटे ४ वाजण्यांच्या दरम्यान घडली.
पांडु खटरावत हे गवंडी काम करतात. ते कुटुंबियांसह टिळेकरनगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांना दोन दिवसांपूर्वी कामाचे पैसे मिळाले होते. घरात खूप उकडत असल्याने ते बाहेर मोकळ्या जागेत झोपत होते. झोपण्यापूर्वी त्यांनी मिळालेले १ लाख ५ हजार रुपये उशाखाली ठेवले होते. ते झोपेत असताना चोरट्याने उशाखालील रोकड चोरुन नेली. पहाटे जाग आल्यावर उशाखाली पैसे नसल्याचे त्यांना आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट अधिक तपास करीत आहेत.