पुणे : एका ६८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास डेटींगसाठी मुली मागविणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढून तब्बल पावणे चार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या एका ६८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ जुलैपासून सुरु होता.
फिर्यादी हे क्वार्टर गेट येथील घरी असताना त्यांना एक फोन आला. त्यांना डेटींगसाठी मुली पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना एका साईटवर रजिस्टेशन करायला सांगितले. त्यासाठी त्यांना एका बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. त्यांनी पैसे पाठविल्यानंतर त्यांना दुसऱ्या मोबाईल फोन वरुन संपर्क साधण्यात आला.
तुम्ही आता रजिस्टेशन केले असल्याने तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतील, अशी भिती दाखवून हे रजिस्टेशन रद्द करायचा असेल तर आणखी पैसे पाठविण्यास भाग पडले. अशाप्रकारे त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली जाऊ लागली. तेव्हा त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतले. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हा गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग केला आहे.