लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : टिळक रोडवरील एका नामांकित डायनिंग हॉलमधून जेवणाचे पॉर्सल ऑनलाईन मागविणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेची ४९ हजार ७६० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली.
याबाबत एका महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या आईवडिलांचा विवाहाच्या आठवणीनिमित्त जेवणाचा डबा मागविण्याचे ठरविले होते. त्यांनी टिळक रोडवरील एका डायनिंग हॉलची जाहिरात सोशल मीडियावर पाहिली. जाहिरातीत असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून जेवणाचा डबा पार्सल मिळेल का ?, अशी विचारणा केली. जाहिरातीत असलेला मोबाइल क्रमांक प्रत्यक्षात सायबर चोरट्यांचा होता. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली आणि १० रुपये आगाऊ रक्कम पाठविल्यास पुढील ऑनलाइन व्यवहार पार पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली.
त्यानंतर महिलेने तिच्या डेबिट कार्डची माहिती लिंकवर पाठविली. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून परस्पर रोकड काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. महिलेने सोशल मीडियावरील जाहिरातीत असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा तो बंद असल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.
या डायनिंग हॉलची सोशल मीडियावर अशा अनेक जाहिराती फिरत आहेत. त्यात एकावर एक थाळी मोफत असेही एका जाहिरातीमध्ये म्हटले आहे. त्यावरुन यापूर्वी अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे.