पुणे : भरधाव जाणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलासह दुचाकीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कैलास वामन आठवले (वय ४८) असे मृत्यू पावलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. ही घटना लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली होती.
दुचाकी गाडी मालक बाळू नागवराव हिवत (वय ४२, रा. बाणेर) व १७ वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजय पांडुरंग आठवले (वय ३६, रा. खडकी बाजार) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळू हिवत यांची दुचाकी गाडी घेऊन एक १७ वर्षांचा मुलगा भरधाव लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरून जात होता. त्यावेळी कैलास आठवले हे रस्ता ओलांडत होते. दुचाकीने त्यांना धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. १७ वर्षांच्या मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला वाहन चालविण्यास दिल्याने दुचाकी मालकाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.