पुणे : मालमत्ता आणि कौटुंबिक कलहातून चक्क बापानेच आपल्या पोटच्या मुलाचा खून करण्याची ७५ लाखांत सुपारी दिली. जंगली महाराज रस्त्यावर १६ एप्रिल राेजी भरदुपारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला हाेता. सुदैवाने पिस्तुलातून गोळी झाडली न गेल्यामुळे बांधकाम व्यावसायिक बचावला. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावला असून, बापानेच मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी पोलिसांनी वडील दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे पाटील (६४, रा. भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे (३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (४८, रा. एरंडवणे), प्रवीण ऊर्फ पऱ्या तुकाराम कुडले (३१, सुतारदरा), योगेश दामोदर जाधव (३९) व चेतन अरुण पोकळे (२७) यांना अटक केली आहे. याबाबत धीरज दिनेशचंद्र अरडगे (३८, रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
जंगली महाराज रस्त्यावर अरगडे हाईट्स या इमारतीच्या खाली बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर दोघांनी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने पिस्तूल कॉक न झाल्याने गोळी झाडली गेली नाही, म्हणून धीरज यांचे प्राण वाचले. या प्रकरणाचा छडा लावण्यात आला.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, रंगराव पवार, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, अंमलदार आण्णा माने, नीलेश साबळे, अनिकेत बाबर, राजेंद्र लांडगे, अमोल आव्हाड, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.
यापूर्वी १० मार्च रोजी झाला होता हल्ला...
बांधकाम व्यावसायिकावर १० मार्च रोजी सूस रोडला चाकूहल्ला झाला होता. हा हल्ला प्रवीण कुडले आणि चेतन पोकळे यांनी केला होता. त्याच दिवशी तक्रारदार यांचा खून करण्याचा प्लॅन होता. त्यानुसार हल्ला केला होता, मात्र सुदैवाने ते यातून बचावले. कुडले आणि पोकळे या दोघांनी दिनेशचंद्र आणि प्रशांत या दोघांना धीरजचा मृत्यू झाला असे सांगून २० लाख रुपये घेतले. प्रत्यक्ष पाहिले असता, दोघांना धीरज जिवंत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कुडले आणि पोकळे यांच्यासोबत दोघांचा वाद झाला होता.
जीपीएसद्वारे ठेवायचे पाळत..
धीरज यांच्याकडे चारचाकी गाडी आहे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी चक्क चारचाकी गाडीला जीपीएस बसवले होते. त्यानुसार त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. घटनेच्या दिवशीही धिरज कार घेऊन ऑफिसमध्ये आल्याचे आरोपींना जीपीएसद्वारेच समजले व त्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वेळा ते थोडक्यात बचावले.
लिव्ह इनमध्ये राहणे वडिलांना नव्हते मान्य
धीरज याचा २०२१ मध्ये पहिला घटस्फोट झाला असून, त्यानंतर तो एका तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. ही गोष्ट वडिलांना मान्य नव्हती. त्यांचे यासोबतच संपत्ती आणि कौटुंबिक कारणातून वाद विवाद होत असत. धीरज नीट बोलत नसत, शिवीगाळ, एकेरी भाषेत बोलत असत, त्यामुळेच त्यांनी काही तरी बंदोबस्त करण्यासाठी विचार केला व घाडगे याच्या मदतीने खुनाचा कट रचला.