पुणे: महाराष्ट्रात पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली आहे. पाणी पाजणाऱ्यांच्या गोष्टी एकल्या होत्या पण आता चहा पाजण्याचे पहिल्यांदाच ऐकले आहे. असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.
देशातील पहिल्या महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अर्थात लोकमत 'ती' चा गणपती मंडळाला मंगळवारी सकाळी खा. सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संपादक संजय आवटे, वृत्तसंपादक सचिन कापसे उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकारणी आणि पत्रकाराचं आगळ वेगळ प्रेमाचं नात असतं. कधी खट्टा कधी मिठ्ठा असतं. विरोधात लिहिल तर हा असं का लिहितोय. चांगल लिहिल तर तो हुशार पत्रकार आहे अस बोललं जात. राजकारण आणि पत्रकारिता एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
तिचा गणपती उपक्रम कौतुकास्पद
बदलत्या काळात वर्तमानपत्राला खूप महत्व आहे. आजही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाला सुरुवात होत नाही. दिवसेंदिवस ऑनलाईचे प्रमाण वाढत चालले आहे. ऑनलाईन बातमीची हेडलाईन आणि बातमी याचा काहीही संबंध नसतो. हा संपूर्ण जगाचाच प्रश्न आहे. असो, ऑनलाईनमुळे तात्काळ बातमी वाचायला मिळते हे खरं आहे. १० वर्षानंतर वर्तमानपत्र असेल की नसेल हे माहित नाही पण काळानुरुप बदलायला हवं. गेली १० वर्षे लोकमतचा ती चा गणपती हा सुरु असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.