पुणे: घरावर विघ्न आले आहे. घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी कराव्या लागतील, तसेच शारीरीक दोष दूर करण्यासाठी जादुटोणा करावा लागेल, असे सांगून पत्नीच्या भावाने ज्योतिषाशी संगनमत करुन एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला तब्बल २८ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत धानोरी येथील एका ३३ वर्षाच्या व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विश्रांतवाडी पोलिसांनी अभिषेक कुलकर्णी काका (वय ३५), विजय गोविंद जाधव (वय ३०, रा. इंदापूर), सदाशिव फोडे (वय ३७, रा़. इंदापूर) यांच्यावर नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध निर्मुलन व काळा जादु अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या घरात काही समस्या जाणवत होत्या. त्यांच्या पत्नीच्या भावाने यासाठी आपल्या ओळखीचा एक ज्योतिषी असल्याचे सांगितले. अभिषेक कुलकर्णी काका हा हस्तरेषा तज्ञ व ज्योतिष असल्याचे सांगत होता. तो एके दिवशी घरी आला. त्याने फिर्यादी यांचा हात पाहून घरातील अडचणी दूर करण्यासाठी एक यंत्र बसवावे लागेल, असे सांगितले. त्यांच्यासाठी हे यंत्र १७ लाख ४६ हजार रुपयांचे तर, भावासाठी २ लाख ८९ हजार रुपयांच असल्याचे सांगितले. काका याचा ड्रायव्हर सदाशिव फोडे याच्या बँक खात्यावर त्यांनी पैसे पाठविले. त्याने यंत्र आणून घरात बसविले. त्यानंतर त्यांना फरक पडला असा भास झाला. त्यानंतर वेळोवेळी घरातील इतर समस्या, कोरोना प्रतिरोध, पितृदोष, घरशांतीसाठी धार्मिक विधी करावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून ते पैसे लुटत राहिले.
दरम्यान, एके दिवशी कुलकर्णी काका त्यांच्या घरी आले. त्यांनी तुमच्या व भावाचे शारीरीक दोष दूर करण्यासाठी पुजा करावी लागेल, असे सांगितले. त्यांच्या घरी पुजा केली. त्यात त्याने कणकेचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांना घरातील दागिने घालण्यास सांगितले. त्यानंतर आता हे पुतळे मठात घेऊन जाणार असून तेथे आठ दिवस पुजा करण्यात येणार असल्याचे सांगितले. दागिन्यासह पुतळे ते घेऊन गेले. त्यानंतर ते पुन्हा आले नाही. दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाल्याने त्यानंतर तुमचे दागिने परत करतो, असे तो सांगत होता. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. फिर्यादीच्या पत्नीच्या भावाला विचारले तर त्याने आपल्याला काही माहिती नाही, असे सांगून हात वर केले. शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितले.