पुणे : सदाशिव पेठेतल्या थरारक घटनेने शहरात खळबळ माजवली आहे. या घटनेत माथेफिरू या तरुणीवर हल्ला करताना धाडसाने पुढे जाऊन तिला वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. राजकीय नेते, अभिनेते, कलाकार यांच्याकडून या रियल हिरोंचे अभिनंदन केले जात आहे. तर काही ठिकाणी त्यांना सत्काराला बोलावले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा जिगरबाज तरुणांशी फोनवरून संवाद साधला आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यालयातून तरुणांनी फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. फडणवीस यांनी कौतुकाची थाप देत लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील दोघांचेही अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना धन्यवाद. तुमचा फोन आला आणि तुम्ही आमच्याशी बोलत आहात हे फारच छान वाटत असल्याचे सांगितले आहे. तर हर्षद पाटीलने अभिनंदन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. त्यांचा फोन आल्याने आम्ही आनंदी झालो असल्याच्या भावनाही दोघांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो - अजित पवार
''पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी मोठ्या शिताफीनं धैर्य दाखवून एका तरुणीचा जीवघेण्या हल्ल्यातून जीव वाचवला, माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला. अशा काही तरुणांमुळे पुण्यात सौहार्दयाचं वातावरण आणि पुण्याची संस्कृती टिकून आहे. या दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो'', अशी फेसबुक पोस्ट अजित पवारांनी केली. तर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीसुद्धा दोन्ही तरुणांचे अभिनंदन केले होते.
तिच्यात आम्हाला बहीण दिसली आणि आम्ही झेपावलो
एक तरुणी 'वाचवा, वाचवा' असे ओरडत पळते... हातात कोयता घेऊन एक तरुण तिच्या मागे पळत असताे... कोयत्याचा पहिला वार तरुणीला वरच्या वर शिवून जातो आणि रक्ताच्या धारा सुरू हाेतात... तरुणी पायात पाय अडकून खाली पडते... आजूबाजूची माणसं तिला वाचवण्यासाठी पुढे येतात; मात्र त्यांच्यावर सुद्धा माथेफिरू कोयता उगारत असल्याने घाबरून पळतात... तरुणी पुन्हा उठून एका बेकरीत शिरण्याचा प्रयत्न करते, मात्र बेकरीचा मालक दुकानाचे शटरच बंद करतो... तरुणी हतबल होऊन दोन्ही हात डोक्यावर ठेवून जीवाच्या आकांताने ओरडत असते... तिच्यावर दुसरा वार होणार... तितक्यात लेशपाल जवळगे हा जिगरबाज तरुण माथेफिरू तरुणाचा हात धरतो आणि हर्षद पाटील त्याला मागून घट्ट धरतो. दिनेश मडावी हादेखील मदतीला आला, तेव्हा त्याच्या कपाळावर कोयत्याचा मूठ लागतो आणि तरुणी थोडक्यात बचावते. या सगळ्यात फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती. यावर लेशपाल म्हणताे ‘तिच्यात आम्हाला बहीण दिसली आणि आम्ही झेपावलो!’