पुणे :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवली, तर त्याचा मला अधिक आनंदच होईल, असे वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून फडणवीस यांना पुण्यातून लोकसभा उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. बापट म्हणाले, जर संघटनाच उमेदवार द्यायला लागल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर संघटनांनी जे योग्य-अयोग्य वाटते. तसा प्रचार करावा.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर महापालिका निवडणुकीसाठी चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर बापट म्हणाले, राज्यात दोन सरकारे आली आणि दोन्ही सरकारांनी प्रभाग रचनेचा वेगवेगळा निर्णय घेतला. नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा प्रभाग रचना बदलली आहे. यामध्ये निवडणूक आयुक्त, सरकार आणि न्यायालय या एजन्सी येतात. त्यामुळे पालिका निवडणुका कधी होतील यामध्ये थोडासा गोंधळ आहे, असेही ते म्हणाले.