भोर : मांढरदेवी यात्रेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरचे खड्डे भरणे, घाटातील दरडी, गवत काढून रस्ता रुंद करणे रंगरंगोटी व रिफ्लेक्टर, नामफलक लावण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात कापूरव्होळ-भोर मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने सर्व कामे पूर्ण होतील. रस्ता वाहतुकीला सुरळीत होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकरराव दराडे यांनी सांगितले.११, १२ व १३ जानेवारी रोजी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मांढरदेवची काळूबाईच्या यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांना विविध कामांबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्त्यावरील पुलांना व झाडांना रंगरंगोटी केली आहे. ठिकठिकाणचे खड्डे भरण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आंबाडखिंड घाटात भोर हद्दीपासून डोंगरात पडलेल्या दगडमातीच्या दरडी व गवत काढून रस्तारुंदीकरणाचे काम सुरू असून घाटातील रस्त्याचे डांबरीकरण व रेलिंगची कामे यापूर्वीच करण्यात आली आहेत. भोर-मांढरदेव रस्त्यावर ठिकठिकाणी रिफलेक्टर व फलक लावण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान भोर-मांढरदेव रस्त्यावर वाघजाई नगरजवळ अरुंद मोरी आहे. तिचे रुंदीकरण न झाल्याने दुहेरी वाहतुकीला अडथळा येत असल्याने एकेरी वाहतूक करावी लागते. त्या ठिकाणी वाहनचालकांच्या माहितीसाठी रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात कापूरव्होळ-मांढरदेवीदरम्यानच्या रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण होतील आणि रस्ता वाहतुकीला सुरळीत होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. (वार्ताहर)
भाविकांचा प्रवास होणार सुरळीत
By admin | Published: January 03, 2017 6:26 AM