विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाकडे कौशल्य आहे हे कळून येईल; अजितदादांचा भाजपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 03:57 PM2022-06-16T15:57:01+5:302022-06-16T15:57:08+5:30
राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरच काही शिकतील
बारामती : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये जे झालं याबाबत विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही काळजी घेऊ. राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरच काही शिकतील. विधान परिषद निवडणुकीमध्ये अधिक चांगला निकाल कसा येईल हे पाहिले जाईल. या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाकडे कौशल्य आहे आणि नाही हे सुद्धा कळून येईल, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना दिला.
बारामती येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले. ते पुढे म्हणाले, दिनांक १८, १९, २० तीन दिवस सर्व आमदार मुंबईमध्ये थांबतील, अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. आम्ही सुद्धा आज मुंबईमध्ये जात आहोत. सर्व आमदारांना त्या ठिकाणी बोलावले आहे, अशी माहिती दिली. महाविकासआघाडी मधील काही आमदार नाराज असल्याची सध्या चर्चा आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वांचीच शंभर टक्के कामे होत नसतात सत्तेत असणारा आमदार आपली कामे पुढे नेत असतो त्यामध्ये गैर काहीच नाही. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'अजित दादा स्पष्टवक्ते आहेत त्यांनी आमच्या सोबत येऊन सरकार स्थापन करावे' अशी खुली ऑफर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती, यावर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, कुणी काही बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही जेथे आहोत त्या ठिकाणी आमचं बरं चालले आहे, असे उत्तर दिले. ओबीसी जनगणने बाबत आज सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. समान आडनावामुळे ही जनगणना कशा पद्धतीने करता येईल याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठक नुकतीच मुंबई येथे झाली आहे. घटनेनुसार राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च संविधानीक पद असल्याने या पदाचा व सर्वसामान्य जनतेचा संपर्क कमी होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तिच आमच्या पक्षाची देखील भूमिका होती. आज पर्यंत पवार साहेब सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करत आले आहेत. त्यामध्ये त्यांना समाधान मिळते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.''