पिंपरी : टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथील झाल्यानंतर जिल्ह्यातील उद्योग पूर्वपदावर येत असून, क्षमतेच्या पन्नास टक्के उत्पादन सुरु झाले आहे. मात्र, कोविड-१९ पुर्वीची उत्पादन पातळी गाठण्यास उद्योगांना कमीत कमी तीन महिने ते नऊ महिने कालावधी लागेल, अशी माहिती बहुतांश उद्योगांनी दिली. तर, काहींनी स्थिती पूर्वपदावर येण्यास नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याचे सांगितले.मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमइ) आणि इतर उद्योगातील शंभर कंपन्यांची पाहणी केली. त्यात ५३ टक्के सूक्ष्म, ४३ टक्के लघू, ११ टक्के मध्यम आणि चार टक्के मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. सर्वेक्षण केलेल्या उद्योगातील ५७ टक्के कंपन्या उत्पादन आणि २५ टक्के कंपन्या सेवा क्षेत्रातील आहेत. तर उर्वरीत कंपन्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील आहेत.
कामगारांची उपस्थिती वाढलीटाळेबंदी शिथील केल्यानंतर कामगारांची उपस्थिती हळू हळू वाढत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यामध्ये कामगारांच्या उपस्थितीचे प्रमाण ४७ टक्के होते. ते, आॅगस्ट महिन्यामध्ये ५६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
अशी आहे उत्पादनाची स्थितीकंपन्यांमधील उत्पादनात वाढ होत आहे. जुलैमध्ये ४० टक्के असणारे उत्पादन ऑगस्ट महिन्यामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
भविष्यातील स्थिती काय असेल?सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांना नजीकच्या भविष्यातील उत्पादनाची स्थिती काय असेल याबाबत विचारणा करण्यात आली. कोविड-१९ पुर्वी म्हणजे जानेवारी २०२० मधील उत्पादन पातळी गाठण्यास कंपन्यांना किती कालावधी लागेल असे विचारले असता १५ टक्के कंपन्यांनी ३ महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले. मात्र, ५५ टक्के कंपन्यांनी जानेवारी २०२० मधील स्थिती गाठण्यास ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले. तर, १५ टक्के कंपन्यांनी स्थिती पुर्वपदावर येण्यास ९ महिन्यांहून अधिक कालावधी लागेल अशी प्रतिक्रिया दिली.