उरवडे मध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान आज चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होऊन त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
उरवडे मध्ये काल आग लागून १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनास्थळी आज राष्ट्रवादीचा खासदार सुप्रिया सुळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना वळसे पाटिल म्हणाले ,"अतिशय दुर्दैवी घटना आहे. खासगी औद्योगिक वसाहतीतल्या या कंपनीत ज्वलनशील वास्तू असल्यामुळे १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली यासाठी समिती नेमली आहे. याचा अहवाल आजच प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर कारण स्पष्ट होऊ शकेल. आणि त्यानंतर प्राथमिक अहवाल प्राप्त झाला की गुन्हा दाखल केला जाईल."
दरम्यान हे मृतदेह ओळखणे देखील अवघड झाले असल्याने या सर्वांची डीएनए चाचणी केली जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वळसे पाटील म्हणाले ,"मृतदेह ओळखणे अवघड असल्याने डीएनए चाचणी करून मगच त्यांची ओळख पटवली जाईल. यासाठी तीन दिवस लागू शकतात. त्यानंतर मृतदेह ताब्यात द्यायचे की एकत्रित अंत्यसंस्कार करायचे याचा निर्णय घेतला जाईल.