पुणे : अहो, सविता आता पस्तीशीला आलीये; तिचं लग्न करायचंय का नाही? नक्की कुठं अडलंय? असा खोचक प्रश्न नातेवाईक किंवा शेजारच्या मंडळीकडून कुटुंबांना अनेकदा विचारला जातो. मात्र, तरूण-तरूणींना त्याची पर्वा नाही. गेल्या काही वर्षांमधला वाढत्या घटस्फोटांचा विचार करता ’लग्न’ म्हणजे तडजोड हेच आता तरूण-तरूणींना मान्य नाही. मनपसंद जोडीदार मिळण्यासाठी लग्नाला विलंब लागला तरी चालेल, हरकत नाही. इथं घाई कुणाला आहे? अशाप्रकारची मानसिकता तरूण पिढीमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांकडूनही मुला-मुलींच्या लग्नासाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
एक काळ असा होता, वयाची विशी उलटल्यानंतर कुटुंबात मुली़च्या लग्नाची चर्चा सुरू होई. मुलीला जे काही पुढे शिकायचे आहे ते ती नव-याच्या घरी जाऊन शिकेल, अशी मुलींच्या आई-वडिलांची विचारसरणी होती. मात्र, लग्नापेक्षा मुली करिअरला अधिक प्राधान्य देऊ लागल्यानंतर हे चित्र काहीसे बदलत गेले. आज तरूणी तरूणांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. किंबहुना तरूणांपेक्षा जास्त कमवत आहेत. त्यामुळे करिअरिस्ट तरूणींच्या लग्नाच्या बोहल्यावर चढताना तरूणांकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत आणि या अपेक्षाच तरूणतरूणींच्या लग्नाच्या विलंबास कारणीभूत ठरत आहेत. तरूणींच्या अपेक्षा पूर्ण करणे तरूणांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे तर जोपर्यंत मनासारखी मुलगी मिळत नाही तोपर्यंत लग्नासाठी थांबण्याची तरूणांनी तयारी दर्शविली आहे.
''आजही पत्रिका बघूनच विवाह जुळविण्याकडे वधू-वरांच्या कुटुंबियांचा कल आहे. पत्रिका जुळत नसल्यामुळे अनेक तरूण-तरूणींच्या विवाहांना विलंब लागत आहे. यातच ओळखीमध्येच नातेसंबंध जुळले पाहिजेत अशी देखील त्यांची इच्छा आहे. याशिवाय तरूण-तरूणींना जोडीदार सुंदरच हवाय. भावी पत्नी कमवती पाहिजे अशी तरूणांची अपेक्षा आहे तर पत्नी कमावती हवी असेल तर माझ्यापेक्षा भावी पतीचे पँकेज हे दुप्पट हवे असा तरूणींचा हट्ट आहे. पुण्याचा विचार केला तर तरूणींना पुण्यातलाच जोडीदार हवाय आणि तो देखील एकाच क्षेत्रातला असावा असा त्यांचा आग्रह आहे. तरूण-तरूणींना जोपर्यंत हवा तसा जोडीदार मिळत नाही तोपर्यंत त्यांचे पालक देखील विवाहासाठी अटटहास करत नाहीत अशी माहिती वधू वर सूचक केंद्राच्या विराज तावरे यांनी दिली.'' वय वाढले म्हणून कुणाच्याही गळ्यात वरमाला का घालायची
''मला मनासारखा जोडीदार हवा आहे. उगाचच लग्नासाठी तडजोड करणे मला पटत नाही. वरासाठीची शोध मोहीम सुरू आहे. वय वाढले म्हणून कुणाच्याही गळ्यात वरमाला का घालायची? मी स्वत: कमावते. त्यामुळे मी स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे. जेव्हा मनपसंद जोडीदार मिळेल तेव्हा लग्न करेन. मला लग्न करण्याची मुळीच घाई नसल्याचं अपर्णा मोघे म्हणाली.''
तरुणींच्या अपेक्षाच खूप वाढल्या आहेत
''आजच्या काळात तरूणींच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. तरूणाचा पुण्यामुंबईत फ्लँट हवा. त्याला इतकेच पँकेज हवे. घरात सासू-सासरे नकोत. सुरूवातीलाच तरूणी त्यांच्या अपेक्षा सांगत असल्याने मग पुढे नातं जुळवण्याचा प्रश्नच येत नाही. यातच माझा आणि आमच्या कुटुंबाचा पत्रिकेवर अधिक विश्वास आहे. पत्रिका जुळत असेल तरच आम्ही पुढची बोलणी करतो. अनेकदा त्या जुळतात पण स्वभाव, आवडीनिवडी जुळत नाहीत. त्यामुळे विवाह जुळण्यास अडचणी येत असल्याचे संग्राम मुळेने सांगितले आहे.''