पुणे : संगणक अभियंता तरुणीला तिच्या सहकाऱ्याने मोटारीत तसेच रस्त्यावर बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी पहाटे खडकीमध्ये घडली. मोबाईल देण्यास नकार दिल्यामुळे पारा चढलेल्या या तरुणाने तरुणीला अक्षरश: बेशुद्ध होईपर्यंत मारले. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुहास भोसले यांनी दिली.जुबेर ख्वाजा पटेल (वय २५, रा. पटेल मंजील, जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची डोंबिवलीची राहणारी आहे. ती मगरपट्टा येथील एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करते. ती सध्या पिंपळे गुरव भागातच राहण्यास आहे. तिच्याच कंपनीमध्ये जुबेर काम करतो. एकाच भागात राहणारे असल्यामुळे कंपनीच्या एकाच मोटारीमधून अन्य सहकाऱ्यांसह ये-जा करतात. ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळले होते. परंतु, काही काळाने जुबेरने हे संबंध तोडले. त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. काही दिवसांनी या तरुणीची दुसऱ्या सहकाऱ्यासोबत मैत्री जुळली. त्या मित्राने जुबेरला शिवीगाळ केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. गुरुवारी रात्रपाळी संपवून पीडित तरुणी घरी निघाली होती. तेव्हा जुबेरही उभा होता. अन्य तीन सहकाऱ्यांसह हे दोघे मोटारीत बसले. घराकडे जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने तिच्याकडे मोबाईल मागितला. तिने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यावरून तिला गाडीमध्येच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. चालत्या गाडीमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. चालकाने बस बाजूला उभी केली. खडकी बस थांब्याजवळ आरोपीने तिला फरफटत बाहेर ओढले. पदपथावर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर ग्लानी येऊन पडलेल्या या तरुणीचा गळा दाबला. दरम्यान, त्यांचे तीन सहकारी धावले. त्यांनी त्याला पकडून तरुणीची सुटका केली. (प्रतिनिधी)
आयटीतील तरुणीला बेदम मारहाण
By admin | Published: January 14, 2017 3:42 AM