पुणे : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. पण ‘आरोग्य व शारीरिक शिक्षण’ विषयाच्या परीक्षेबाबत शिक्षक, पालक यांच्यात संभ्रम आहे. अचानक तीन दिवसांपूर्वी सांगितले की, शारीरिक शिक्षण विषयाची प्रात्याक्षिक परीक्षा घ्यावी? पण विद्यार्थी महाविद्यालयातील मैदानावर आले तर गर्दी होणार? एका महाविद्यालयात हजार-हजार विद्यार्थी असून, त्यांची मैदानावर परीक्षा कशी घेणार? या प्रश्नांनी मुख्याध्यापक आणि या विषयाचे प्राध्यापक संभ्रमात आहेत. प्रात्याक्षिक परीक्षा न घेता फक्त लेखी परीक्षा घ्यावी? आणि ग्रेड पध्दतीने गुण देण्यात याव्यात, असा पर्याय सुचविण्यात आला आहे.
शारीरिक शिक्षण विषयासाठी एकूण ५० गुण आहेत. त्यात २५ गुणांची लेखी आणि २५ गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते. या विषयाची परीक्षा घेण्यासाठी शारीरिक शिक्षकांची नुकतीच झूम मिटिंग घेण्यात आली. त्यामध्ये शारीरिक शिक्षकांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातून फारसे काहीच समाधानकारक चित्र पुढे आले नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. मैदानावर परीक्षा घ्यायची कशी ? याबाबत काहीच माहिती दिली नाही, अशी तक्रार शिक्षकांची आहे.
-----------------
२ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार?
- कोरोनाच्या काळात मैदानावर विद्यार्थी बोलावून परीक्षा घेणार कशी ? कारण एकत्र आले की गर्दी होऊ शकते. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- एका महाविद्यालयात २ हजार विद्यार्थी शारीरिक शिक्षणाची परीक्षा देणार आहेत.
- आता त्यांचे पंधरा-पंधरा जणांचे गट करून परीक्षा घेतली, तर त्याला किती दिवस लागतील. एकूणच हा पर्याय धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापकांची आहे.
---------------
कडक निर्बंधात परीक्षा घ्यावी का?
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या महिन्यात सुरू होणाऱ्या परीक्षांबाबतही काय निर्णय होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. त्यातच, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, याबाबतही सरकार विचार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्येच या शारीरिक शिक्षण विषयावर परीक्षा घ्यावी, असे परिपत्रक आले आहे. त्यामुळे शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम आहे. एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलली, मग शारीरिक शिक्षणाची मैदानावर कशाला, असा सवालही उपस्थित होत आहे.
-----------------
मैदानाऐवजी लेखीच परीक्षा घ्या
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना मैदानावर बोलवून परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते. याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी सध्याच्या परिस्थितीत प्रात्यक्षिक परीक्षा न घेता फक्त लेखी परीक्षा घेऊन यंदाच्या
वर्षी ग्रेड देण्यात याव्यात, असा पर्याय
काही शिक्षकांनी सुचविला आहे. तसेच मैदानावर परीक्षा घेण्याला पालकांचा देखील विरोध आहे.