पुणे : ‘‘मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं आहे. पण यावेळी भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत. म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होईल, पण जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला आनंदच होईल,’’ असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केले.पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. अजित पवार आणि त्यांच्या पक्षांनी देवेंद्र फडणवीस चालतील, अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले असल्याने मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा सुटलेला आहे. अशातच भुजबळ यांनी पुण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल, असे सांगितले आणि त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छादेखील दिल्या.भुजबळ म्हणाले, ओबीसी मुख्यमंत्री व्हावा, यापेक्षा गोर-गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा हीच आमची अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये चांगलं काम केलं आहे. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम दिलं, त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदावर बसले तर आनंद होईल.’’मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मी ईव्हीएम मशीनमुळे जिंकलो असेल, तर मलादेखील एक लाख मतं मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं, ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहापासून रात्री दोनपर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याचं काम केलं, म्हणून माझं मताधिक्य कमी झालं असेल !’’आम्ही मराठा समाजाविरोधात नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्यावे, ते त्यांना मिळायला हवं. सरकारने त्यांना आरक्षण दिले आहे. त्यांना १० टक्के ईबीसी आरक्षण ठेवले आहे. गोर-गरिबांना न्याय मिळायला हवा.- छगन भुजबळ, माजी मंत्री
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं, पण फडणवीस यांना शुभेच्छा..! छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:23 IST