पुणे : प्रभागातील कचरा प्रभागात जिरवावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून सांगितले जात असताना प्रत्यक्षात भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून बाणेरच्या कचरा प्रकल्पाला विरोध करून तो हटविण्याची करण्यात येत असलेली मागणी चुकीची असल्याची टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. शहरातील कचरा प्रकल्पांना विरोध सुरू झाला तर शहराबाहेरच्या लोकांकडून कचरा प्रकल्प कसे उभा करू दिले जातील, अशी विचारणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.बाणेर येथील नोबेल एक्स्चेंज एन्व्हायर्न्मेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रकल्पाला महापालिका आयुक्त कुणाल कुमार, आमदार मेधा कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे.महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे चेतन तुपे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)चेतन तुपे यांनी सांगितले, ‘‘बाणेरचा एक प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित केला तर शहरातील इतर ठिकाणचेही कचरा प्रकल्प हलविण्याच्या मागण्या केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट हे प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवावा, अशी घोषणा देत असताना त्याच्या विरुद्ध कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी करणे चुकीचे आहे.’’अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘बाणेर येथील कचरा प्रकल्पामध्ये दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेनंतर तयार झालेले रसायन तळेगाव येथे नेऊन त्यापासून साडेचार हजार क्युबिक मेट्रिक सीएनजी तयार केला जातो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणारा इतका मोठ्या प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे.’’
कचरा प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे
By admin | Published: March 28, 2017 2:58 AM