सुषमा नेहरकर-शिंदे/पुणे - शेतीत काम करायला मजुर मिळत नाहीत, रासायनिक खते, औषधांचा होणारा अव्वाच्यासव्वा खर्च, प्रचंड कष्ट व हजारो रुपये खर्च करून बाजारात दर मिळण्याची खात्री नाही. यामुळे आजचा शेतकरी रासायनिक शेतीला कंटाळला आहे. ग्राहकदेखील पैसे मोजून विषयुक्तच भाजी-पाला विकत घेतो. याला एकच पर्याय म्हणून शून्य खर्चाची विषमुक्त नैसर्गिक शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथील खडकाळ माळरानावर आयटी क्षेत्रात काम करणा-या एका तरुणाने तब्बल 30 एकरमध्ये या प्रकारची शेती सुरू केली आहे.
माधव घुले हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपासून झिरो बजेट शेती करत आहे. दौंड तालुक्यातील 30 एकर खडकाळ माळरानावर गवत उगवणे कठीण असताना आज कृषीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या तंत्रज्ञानानुसार नैसर्गिक शेती पद्धतीनं येथे बाजरी, ऊस, शेवगा, तुर, मका, भुईमुग, केळी, गहू आदी सर्वच प्रकारची पिके जोमात उभी आहेत. गाईचे शेण व गोमूत्र या माध्यमातून पिकांवर येणा-या रोगराईवर पूर्णपणे नियंत्रण केले. एकाच पिकामध्ये वेगवेगळी पिके घेऊन आंतर पिकांचा प्रयोगदेखील यशस्वी केला. यामुळे पद्धतीनं नैसर्गिक शेती केल्याने एका आठवड्यात शंभर-शंभर किलो शेवगा, अर्धा एकरमध्ये 8 पोती बाजरी, गहू, ऊसचे पिक देखील शून्य खर्चात भरघोस उत्पन्न मिळाले असल्याचे घुले यांनी सांगितले.
घुले यांनी सांगितले की, मेडिकल क्षेत्राशी संबंधित एक सॉफ्टवेअरचे काम करताना सध्याच्या रासायनिक शेतीमुळे माणसांच्या शरीरावर होणारे प्रचंड दुष्परिणामाची जाणीव झाली. यामुळेच मी विषमुक्त व नैसर्गिक शेतीकडे वळलो. आज आम्ही घरात लागणारे सर्व कडधान्य, भाजी-पाला आमच्या शेतातील पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन केलेले खातो. माझ्यासह अन्य काही शेतकरी मित्रदेखील याच पद्धतीनं शेती करतात. घरात वापरून क्षिल्लक राहिलेला शेतीमाल पुण्यात विविध सोसायटींमध्ये विक्रीसाठी 'व्हॉट्सअॅप ग्रुप'च्या माध्यमातून विक्रीसाठी पाठवतो. परंतु सध्या स्वत: ला, मुलांना व कुटुंबातील व्यक्ती व काही ग्राहकांना तरी किमान विषमुक्त कडधान्य व भाजीपाल आपण देऊ शकतो यांचे समानध असल्याचे घुले सांगतात.
तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत चालले आहे. याला एकच पर्याय म्हणजे सुभाष पाळेकर यांची शून्य खचार्ची नैसर्गिक शेती हा आहे. या शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन स्वत: पाळेकर देशात तसेच परदेशात शिबिरांच्या माध्यमातून करत आहेत. शेतक-यांपर्यंत शून्य खर्चाची नैसर्गिक शेती पोचवून प्रत्येकाला विषमुक्त अन्न मिळेल. तसेच कॅन्सरमुक्त व व्याधीमुक्त गावे करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आम्ही हा झीरो बजेट व विषमुक्त शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. जिल्ह्यातील अन्य शेतक-यांनीदेखील प्रत्यक्ष येऊन हा प्रयोग पहावा व त्याचा अवलंब करावा, असे माधव घुले म्हणालेत.