पौड : पूर्वीच्या काळी मुळशी व कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून ओळख आहे.परंतु, काळाच्या ओघात सर्वांना अपरिचित असणारा सावळ्या घाट शिवदुर्गं संवर्धन संस्थेच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. मुळशी तालुक्याचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या ताम्हिणी घाट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालीत आला आहे. मुळशी तालुक्यातून कोकणात जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी अलीकडील काळात डांबरी रस्त्याची सोय झाली असली तरी पूर्वीच्या काळी मात्र प्रवाशाना पायवाटेनेच प्रवास करावा लागत होता. पुण्याहून कोकणात जाण्यासाठी आता अनेक वाटा असल्या तरी प्राचीन देशावरून कोकणात उतरण्यासाठी सर्वात जवळची व ऐतिहासिक पायवाट म्हणून सावळ्या घाट मार्गाचा वापर केला जात असल्याचे मुळशीतील जुन्या व जाणत्या मंडळींचे म्हणणे आहे. मुळशीतून कोकणात जाण्यासाठी घाटमार्गातून जाणारी एक पाऊलवाट ताम्हिणी घाट परिसरातील निवे गावाच्या हद्दीत असल्याची माहिती श्री शिवदुर्गं संवर्धन संस्थेचा कार्यकर्त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे संस्थेचे कार्यकर्ते व प्राचीन वास्तूं व अवशेषांचे अभ्यासक आकाश मारणे, एकनाथ वाळंज, शिवाजी शिळीमकर यांनी निवे येथील स्थानिक ग्रामस्थ राजू गोरे यांना सोबत घेऊन मागील वर्षी उन्हाळ्यात या घाट मार्गाची पाहणी केली.त्यावेळी त्यांना या घाट मार्गांवर खडकात कोरलेली एकसारख्या आकाराची आठ फूट लांब,पाच फूट उंच व चार फूट रुंदीची तीन पाण्याची टाकी व तीन ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या. हा घाट रस्ता किती जुना आहे व याला सावळ्या घाट का म्हटले जाते याबाबत स्थानिक ग्रामस्थ किंवा इतिहासातही फारशी उपलब्ध नाही. पुणे कोलाड या डांबरी रस्त्याचे काम होण्यापूर्वी निवे ग्रामस्थ कोकणात भिरे गावाला जाण्यासाठी या घाट मार्गाचा काही प्रमाणात वापर करत होते. परंतु अलिकडीलकाळात वाह्तुकीच्या रस्ते व साधनांची सोय झाल्याने विळे मार्गे जाणे सुरू झाले आणि या घाट रस्त्याचा वापर पूर्णच बंद झाला. कोकणात जाण्यासाठी सुमारे पस्तीस ते चाळीस किलोमीटरचे अंतर कमी करणारा हा ऐतिहासिक घाट मार्ग नव्या पिढीला माहिती व्हावा तसेच येथील पायऱ्या व पाण्याच्या टाक्यांचे पुनुरुज्जीवन व्हावे या हेतूंनी श्री शिवदुर्गं संवर्धन संस्थेने पुढाकार घेऊन ता १७ नोव्हेम्बर रोजी सावळ्या घाट संवर्धन मोहिमेचे आयोजन केले होते.
या ऐतिहासिक मार्गाच्या संवर्धनासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक संस्था व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान केले. यामध्ये श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, गड झुंझार मावळे प्रतिष्ठान पुणे, दुर्ग वेध प्रतिष्ठान पुणे, समस्त ग्रामस्थ निवे, पराते वाडी येथील ग्रामस्थ असे सुमारे ५० इतिहास प्रेमींचे सहभागी झाले होते. दिवसभराच्या श्रमदानातून येथील एका पाणी टाक्याची तसेच खडकातील दगडी पायऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी न्याहारीची सोय ढोकळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोकळे यांनी व दुपारच्या जेवणाची सोय निवेचे सरपंच संगीता संतोष गोरे यांनी केली होती.
............................
या सातवाहन कालीन सावळ्या घाटाचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी तसेच या घाट मार्गाचे पुनुरुज्जीवन करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. देवकुंड व कुंडलिका व्हॅली तसेच अंधारबन या पर्यटन स्थळांपर्यटन पर्यटकांना पोहचण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून पर्यटकांची ये जा वाढल्यास येथील पर्यटन व्यवसायास चालना मिळून स्थानिक तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार मिळण्यास मदत होईल याकरिता आमचा प्रयत्न आहे. श्री दुर्ग संवर्धन संस्थेने आयोजित केलेल्या य अत्यन्त अवघड अशा मोहिमेत १० वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षाचे आजोबा तसेच महिला व मुलींनी अत्यन्त उत्साहाने सहभाग घेतला होता. पुढील काळातही अशा मोहिमा आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे.आकाश मारणे, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था.