पुणे : पोटगी व मुलीचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात सुरू असलेली केस सासू मागे घेत नाही, याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चाकूने वार केल्याची घटना हवेली तालुक्यातील नायगाव येथे घडली. ही घटना बुधवारी (दि. १३) सायंकाळी नायगाव येथे घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.
या घटनेत अलका विठ्ठल गवळी (५०, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (२८, सध्या रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली, मूळ रा. शिंदे वस्ती, रेल्वेलाइन जवळ, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई संग्राम बळवंत शिंदे (३८, रा. शिंदे वस्ती, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
फिर्यादी रुपाली शिंदे या त्यांच्या आई अलका गवळी यांच्यासोबत नायगाव येथे राहतात. रुपाली यांची पोटगी व मुलीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात केस सुरू आहे. आरोपी संग्राम शिंदे हा बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायगाव येथील सासूच्या घरी आला. त्याने रुपाली यांना केस मागे घेण्यास सांगितले. यावर फिर्यादी रुपाली यांनी ‘जे काही होईल ते न्यायालयात होईल’ असे सांगितले.
यामुळे चिडलेल्या संग्राम याने टीफीनच्या पिशवीतून आणलेला चाकू बाहेर काढत ‘तुला जिवानिशी सोडणार नाही’ असे म्हणत रुपाली यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी रुपाली यांची आई अलका गवळीमध्ये आल्या. ‘तुझ्यामुळेच सगळे होत आहे, तूच केस मिटवू देत नाहीस, तुलाच खल्लास करतो’ असे म्हणत संग्राम याने अलका गवळी यांच्या पोटात दोन ते तीन वेळा चाकू खुपसला. तसेच त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये अलका गवळी या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल घोडके करत आहेत.