पुणे : राफेल विमानाच्या चाकांच्या खाली लिंबू ठेवणे अवैज्ञानिक आहे. अशा गोष्टी आधुनिक ठिकाणी वापरणे लाजिरवाणे असल्याची टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस मिलिंद देशमुख यांनी केली.
भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिवस आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर एका एअरबेस राफेल विमानाचा ताबा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला. पॅरिसमध्ये त्यांनी विमानात उड्डाण करण्यापूर्वी त्याची पूजा केली. त्यावेळी चाकांच्या खाली लिंबूही ठेवण्यात आले होते. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. काहींनी पूजा आणि लिंबू ठेवण्याचे समर्थन केले असून काहींनी त्यावर टीका केली आहे.
अंनिसनेही याविषयी नाराजी व्यक्त केली असून देशमुख म्हणाले की, 'स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा काळ लोटला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावरही अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नव्हत्या. आता तर आपण विज्ञान युगातही अवैज्ञानिक कृत्य करतोय असं जगाला दाखवत आहोत. कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव तपासणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. त्यामुळे कितीतरी शिकलेले किंवा आधुनिक ज्ञान घेतलेले असू द्या, जर अशा गोष्टी करत असतील आणि समर्थनही करत असतीलकी दोन लिंबू ठेवल्याने काय बिघडणार आहे तर हा आपल्या सगळ्याच वैज्ञानिक प्रगतीचा अपमान आहे, असे महाराष्ट्र अंनिसला वाटते. आपण असे कृत्य करणे म्हणजे पुढच्या पिढीला अवैज्ञानिक बनवण आहे.आपल्याकडे ज्या अनिष्ट अंधश्रद्धा आहेत त्यांना बढावा देण्यासारखी गोष्ट आहे. भारताच्या संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. अशा गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या ठिकाणी वापरल्या जातात ही लाजिरवाणी गोष्ट आहे'.
राफेलविषयी अधिक माहिती
भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सप्टेंबर 2016ला भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल विमान खरेदी करण्याचा करार झाला होता. या सर्व विमानांची किंमत 7.87 अब्ज यूरो ठरविण्यात आली होती. भारतीय वायुसेनेचे 24 पायलट हे राफेल विमान चालवू शकतील. हे सर्वजण तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करतील. पुढच्या वर्षी फ्रान्सतर्फे मे महिन्यापर्यंत सर्व राफेल भारताकडे सोपवण्यात येणार आहे.