ओतूर : पाच वर्षांपूर्वी मी तुम्हाला न विचारता अमोल कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली. जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून उमेदवारी देण्याचा मी अभ्यास केला लगेच जाहीर केलं; पण नंतर पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला कारभार केला, कधी माझ्या आदिवासी भागात आले नाहीत. कधी कुणाला भेटले नाहीत. कारण स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता. मित्रांनो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट दिले, ही माझी चूक झाली आहे, ती चूक सुधारा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओतूर येथील सभेत केली.
केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता, पाच वर्षांचा बॅकलॉग आपल्याला भरून काढण्यासाठी आढळराव यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्न, पर्यटन, हिरडा प्रश्न, दिवसा वीज यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
कामाचा माणूस व बिनाकामाचा माणूस ओतूरकरांनी नाव दिले आहे. ते कालवा समितीच्या एकाही बैठकीला आले नाहीत. कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागितले. ॲक्टर लोकांचा धंदा आहे पैसा घ्यायचा, कुठेही नाचायचे, अशी टीका करून बेनके यांनी पुढे बोलताना सागितले की, प्रत्येक गावात विकासकामांसाठी मी कटिबद्ध आहे व या जुन्नर तालुक्यातून आढळराव पाटलांना तीस हजारांचे मताधिक्य देणार असे आमदार अतुल बेनके यांनी सागितले.
एवढा मोठा जनसमुदाय पाहता ४ तारखेला काय निकाल लागेल, सांगायची गरज नाही, अमोल कोल्हे यांनी पाच वर्षांत काय केले नाही, त्यांनी जनतेकडे पाठ फिरवली. कुठल्याच गावात गेले नाही, निधी दिला नाही, काही विकास केला नाही, नाटके करणारा माणूस अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
खासदारांच्या दत्तक गावाला मी पाणी टँकर सुरू केला
मी मोठ्या प्रमाणात बैलगाडा घाट बांधायचे काम केले. चार वर्षांच्या संघर्षानंतर बैलगाडी शर्यतीची बंदी उठली. बैलगाडे चालू करण्यासाठी सात ते आठवेळा आंदोलने केली. माझ्यावर केस झाल्या. मी दत्तक घेतलेल्या गाव करंडी येथे १७ कोटींची विकासकामे केली व त्यांनी कोपरे मांडवे गाव दत्तक घेतले. तिथे कधी गेले का? मी त्या गावाला पाणी टँकर सुरू केले, हा फरक कामाचा माणूस आणि बिनकामाचा माणूस अशी टीका करून आढळराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, दीड वर्षात पंधराशे कोटी रुपये गावागावांत आणले, पूर्ण मतदारसंघात काम करण्यासाठी ४५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे येणारा खासदार नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा येणे गरजेचे आहे.