पुणे : वारकरी संगीत परंपरा ही अभिजात संगीत परंपरा असून, प्रत्येक परंपरेला स्वत:चे म्हणून शास्त्र असते. शास्त्रीय संगीत. उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत अशी वर्गवारी करणे उचित ठरत नाही असे मत चौदाव्या चौदाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेल्या चौदाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने ‘ वीणा उभा ’ करून झाले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, कार्याध्यक्ष अनिल ससार, पं.यादवराज फड. संजय बालवडकर, सुनील पासलकर. राधाकृष्ण गरड हे मान्यवर उपस्थित होते. डॉ. सबनीस म्हणाले, वारकऱ्यांचे सत्ताकेंद्र एकच आहे, ते म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाच्या भक्तीसाठीच संतानी ही संगीत परंपरा निर्माण केली. म्हणून या परंपरेत विठ्ठलाचे उपचार दिसतात, देव जागा झाला म्हणून काकडारती, संध्या समयी धुपारती . झोपताना शेजारती, देवाला उषणतेचा त्रास होऊ नये म्हणून उटीचे भजन, जागर, वाटचालीचे भजन आदी प्रकार रूढ झाले. निरपेक्ष भक्तीने ओथंबलेली हि संगीत परंपरा आहे .म्हणूनच 800 वर्षांपासून वाढतच आहे आणि वाढतच रहाणार. अभंगाच्या अक्षरावर कुठेही अन्याय होणार नाही असेच पारंपरिक चालीचे नियोजन असते, या परंपरेने आधुनिक काळाचा कल लक्षात घ्यावा, म्हणजे परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी पावेल. मुरलीधर मोहोळ म्हणाले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पंचक्रोशीत पुणे शहरात हे संत परंपरेचे संगीत संमेलन होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. यावेळी स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, पं.यादवराज फड यांची ही भाषणे झाली. उद्घाटनानंतर दत्तात्रय कांबळे यांचे अभंग गायन, कृष्णाई उळेकर ने भारूड तर प्रचला अमोणकर यांनी भक्ती संगीत सादर केले. पूजा सबनीस यांनी सूत्रसंचालन केले.
संगीताची वर्गवारी करणे उचित नाही : डॉ. श्रीपाल सबनीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 8:02 PM