पुणे : डॉ. भा. ल भोळे, डॉ. यशवंत सुमंत यांच्यासारख्या विचारवंतांनी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. आजच्या काळात हीच वैचारिकता जतन करणे आवश्यक आहे. मात्र, ती जपण्यात आपण कमी पडतो. केवळ विचार मांडणाऱ्यांवर ती जबाबदारी टाकणे योग्य नाही, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्था (वर्धा) यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. मोरे बोलत होते. डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ब्रायन लोबो (पालघर) व डॉ. अभय दातार (नांदेड) यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘भोळे स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी २० हजार रुपये व ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे स्वरूप आहे. या शिवाय ‘भोळे स्मृती वैचारिक साहित्य’ पुरस्कारासाठी सत्यशोधकीयनियतकालिके ग्रंथाचे लेखक कोल्हापूरचे डॉ. अरुण शिंदे यांना गौरविण्यात आले. ‘डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रात काम करणारे पालघरचे ब्रायन लोबो यांना तर ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा’ पुरस्कारासाठी नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्रा. डॉ. अभय दातार यांना गौरविण्यात आले. डॉ. चौसाळकर म्हणाले, प्रकाशक, वाचकांचा प्रतिसाद नसल्याने वैचारिक ग्रंथ प्रकाशित होत नाहीत. ते झाले पाहिजेत. सद्यस्थितीत उपस्थित प्रश्नांबाबत स्पष्ट मते मांडली पाहिजेत. कारण प्रश्नांना भिडणे हीच सुमंत, भोळे यांची शिकवण होती.वैचारिक मैत्री दुर्मीळडॉ. मोरे म्हणाले, सर्व प्रकारची मैत्री समाजात होत असताना वैचारिक मैत्री दुर्मीळ होत आहे. वैचारिक परिवार वाढला पाहिजे. समाजात वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. यात आपण कमी पडतो. तरुण अभ्यासकांना प्रोत्साहित केले पाहिजे. हल्ली पुरस्कार प्रक्रियेचे यांत्रिकिकरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार उठून दिसतो.