पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक महिने घरचे अन्न खाऊन आलेला कंटाळा झटकण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सातत्याने बाहेरचे मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराचे नियम पाळण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जात आहेत.
पावसाळ्यात तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. अपचन होणे, अॅसिडिटी वाढणे, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो, आतड्याशी संबंधित विकार वाढतात. पित्ताशयात खडे होणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी असे त्रास पावसाळयातच डोके वर काढतात. हॉटेलमधील चमचमीत पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जातात आणि वजन वाढण्याची शक्यताही निर्माण होते. या दिवसांमध्ये शरीरात वाताचा प्रकोप वाढलेला असतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात पोट सांभाळावे, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-------------------
पावसाळ्यात हे खायला हवे
* पावसाळ्यात घरी बनवलेले ताजे पदार्थ खावेत.
* उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.
* पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.
* भरपूर पाणी पिण्याची सवय पावसाळ्यातही कायम ठेवावी.
पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे
* उघड्यावरचे आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.
* चाट, वडे, भजी अशा पदार्थांमुळे पोट हमखास बिघडते.
* बाहेरचे फळांचे ज्यूस टाळावे.
* मसालेदार, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.
---------------------
पावसाळ्यासाठी वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढतात. जठराग्नी मंद होतो, भूक कमी लागते. या अनुषंगाने आहार आणि विहार यांचे तारतम्य बाळगल्यास पोटाचे आजार होणार नाहीत. वात वाढू नये म्हणून थंड, आंबवलेले पदार्थ टाळावे. उबदार कपडे वापरावे. जेवताना कोमट पाणी प्यावे. वांगी, बटाटा, वाटाणा यासारख्या भाज्या टाळाव्यात. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी पालेभाज्यांचे नियमित सेवन टाळावे. कारण आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये आम्लता वाढते. ओवा आणि बडीशेप समप्रमाणात थोडे भाजून चूर्ण करून ठेवावे. जेवणानंतर दोन्ही वेळा अर्धा चमचा खावे. जेवणात गरम सूप असावे. ज्वारीची भाकरी एका जेवणात असावी.
- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ
-------------------
हॉटेलमध्ये गेल्यावर पावसाळ्यात शक्यतो कच्चे पदार्थ खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांचे पदार्थ बनवताना, हाताळताना जीव-जीवाणू वाढण्याची शक्यता असते. गरम, शिजवलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. उदा: सँडविच खाण्याऐवजी इडली, डोसा असे पदार्थ खावेत. हॉटेलमध्ये शिळे घटक पदार्थ वापरले जात असतील तर त्रास होऊ शकतो. गाडीवरचे वडे, भजी वारंवार एकाच तेलात तळले जातात, त्यामुळे पोटाला त्रास होतो. पदार्थ घरी पार्सल आणताना प्रिटेंड कागद वापरला जात असेल, तर त्यावरची शाई पदार्थात उतरू शकते. त्यामुळे शक्यतो घरचा डबा घेऊन पार्सल आणायला जावे किंवा चांगला कागद वापरला आहे की नाही, ते पाहावे.
- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ
---------------------