पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाविषय जनजागृती करण्यासाठी आता मराठी कलावंत रिंगणात उतरले आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी डिजिटल चळवळ सुरू केली असून, समाजमाध्यमांद्वारे कलाकार हे आयव्होट मोहीम राबविणार आहेत. मतदानाचे कर्तव्य पार पाडा, असे आवाहन कलाकारांकडून केले जाणार आहे. वाईड विंग्ज मीडिया आणि रंगार्त यांच्यातर्फे या मोहिमेचे व्यवस्थापन केले जाणार आहे. अभिनेता आरोह वेलणकर, सौरभ गोखले, सायली संजीव, पौर्णिमा मनोहर, प्रसाद जवादे, कुशल खोत यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या विचारातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. अनुलोम आणि प्रबोधिनी मंच या स्वयंसेवी संस्थांचाही मोहिमेत सहभाग आहे. भारतीय लोकशाही बळकट होण्यासाठी, लोकशाही मूल्ये रूजवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय करता येईल, या विचारातून ही मोहीम राबवण्याची कल्पना पुढे आली. या मोहिमेला अन्य कलाकारांनीही पाठिंबा दिला. सध्या तरूण मतदारांपासून ज्येष्ठांपर्यंत बहुतेक सर्वजण समाजमाध्यमांचा वापर करतात. त्यात ग्रामीण किंवा शहरी असा भेद नाही. त्यामुळे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी डिजिटल मोहीम राबवण्याची कल्पना पुढे आली, असे आरोह वेलणकरने सांगितले.आयव्होट ही मोहीम संवादी पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामध्ये मतदानाविषयीची रंजक माहितीही दिली जाईल. अराजकीय अशी ही मोहीम असून केवळ मतदानासाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे उद्देश आहे. तसेच ही मोहीम व्यापक होण्यासाठी समाजमाध्यमांतील अन्य व्यासपीठांचीही मदत घेतली जाणार आहे, असे सायली संजीव, पौर्णिमा मनोहर, सौरभ गोखले यांनी सांगितले. -----------अधिकाधिक कलाकारांचा सहभागमोहिमेमध्ये मराठी चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रातील कलाकार सहभागी आहेत. त्यात सुबोध भावे, दीप्ती देवी, वैभव तत्त्ववादी, अक्षय वाघमारे, गश्मीर महाजनी, स्पृहा जोशी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. अधिकाधिक कलाकारांना मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. समाजमाध्यमांसह कलाकार आपापल्या परीने मतदारांशी प्रत्यक्ष संवादही साधू शकतील. मात्र, त्याची निश्चित योजना नसल्याचे आरोहने स्पष्ट केले.---------
मतदानाविषयक जनजागृतीसाठी मराठी कलावंतांची ‘आयव्होट’ मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 1:22 PM