लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती तालुक्यात जगद्गुरू तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना नागरी सुविधांची कोणतीही कमतरता भासणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या.नवीन प्रशासकीय इमारतीत जगद्गुरू तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळा पूर्वतयारीसाठी प्रांताधिकारी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या वेळी पालखीस्थळ मुक्काम गावाचे सरपंच, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, नायब तहसीलदार रमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विश्वास ओव्हळ व शहर पोलीस ठाण्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी निकम यांनी वारकऱ्यांसाठी प्राधान्याने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात चर्चा केली. पालखीस्थळावर वीज व्यवस्था नियोजनाची माहिती त्यांनी घेतली. वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त शौचालये उपलब्ध करावीत, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरुस्तीकरण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पालखी स्थळावरील स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तसेच पंचायत समितीची यंत्रणा यांच्यामार्फत करण्याबाबत गावातील सरपंचांना मार्गदर्शन केले.तहसीलदार हनुमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना समन्वयाच्या माध्यमातून आपापसात संपर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या. कोणीही गाफील न राहता आपली जबाबदारी पार पाडा, अशी सूचना त्यांनी केली.
जगद्गुरू तुकोबा, संत सोपानकाका पालखी सोहळा
By admin | Published: May 09, 2017 3:23 AM