लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव: इंदापूर तालुक्याच्या २२ गावांतील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत. शेतीसाठी पाणी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे म्हणत उजनीच्या पाण्यासाठी हिंगणगाव येथे पुणे-सोलापूर महामार्ग अडवत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सोलापूरकरांच्या आडमुठ्या भूमीकेमुळे हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर होत आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाका, शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांसाठी प्रसंगी जेलमध्येही बसण्याची तयारी असल्याचे मत पीपल्स
रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रध्यक्ष संजय सोनवणे यांनी व्यक्त केले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २२ गावांच्या पाण्यासाठी व इतर मागण्यांसाठी ३ जून २०२१ रोजी पासून उजनी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनास तालुक्यातील आनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनाचा आठवा दिवस उजाडला, परंतु न्याय मिळत नसल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन हिंगणगाव येथे पुणे- सोलापूर महामार्ग एक तास रोखून धरत जागरण गोंधळ घातला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी धरणग्रस्तांनी शासनाबरोबर लग्न लावलेले आहे. परंतु या लग्नात जागरण गोंधळ घालण्याचे राहून गेले होते. तो गोंधळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आज आली आहे. लग्नाचा गोंधळ घातल्याशिवाय मूलबाळ होत नाही आणि शेतीला पाणी मिळाले नाही तर शेतकरी जगणार नाही. म्हणून परमेश्वराने उजनी पाणीप्रश्नी शासनाला सदबुद्धी द्यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करत असल्याचे अनिल खोत म्हणाले. यावेळी भाजपचे माऊली चौरे, संजय तांबीले, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, नानासाहेब खरात, आप्पा माने, सुधीर पाडुळे यांचेसह मोठ्याप्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ : हिंगणगाव येथे हायवे रोड रोखून धरत जागरण गोंधळ आंदोलन करताना शेतकरी.