पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत शनिवारी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या सात, तर अपक्ष आघाडीच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. या नियुक्तीमध्ये आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या सदस्यांना स्थान देण्यात आले नाही. महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या सभेत नवीन सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नारायण बहिरवाडे, अमिना पानसरे, रोहित काटे, संदीप चिंचवडे, सुमन नेटके, शुभांगी लोंढे, संजय वाबळे यांचा, तर अपक्ष आघाडीच्या वैशाली जवळकर यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीत संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीकडून अनेक जण इच्छुक होते. यासाठी वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. दरम्यान, शनिवारी सर्वसाधारण सभेत आठ सदस्यांची नावे महापौर शकुंतला धराडे यांनी जाहीर केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने ही नावे निश्चित केली आहेत. स्थायी समितीमध्ये कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. आजच्या निवड प्रक्रियेनंतर याला पूर्णविराम मिळाला आहे. निवडीतून राष्ट्रवादीने आमदार जगताप गटाच्या नगरसेवकांना दूरच ठेवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी)जगताप गटाच्या सदस्यांना स्थान नाहीपूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँगे्रसचे असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांचे समर्थक असलेले नगरसेवक राष्ट्रवादीमध्येच आहेत. हे नगरसेवकदेखील स्थायी सदस्यत्वासाठी इच्छुक होते. मात्र, या नियुक्तीमध्ये एकाही नगरसेवकाला स्थान देण्यात आले नाही.
स्थायी समिती निवडीत जगताप गटाला ठेवले दूरच
By admin | Published: February 21, 2016 3:02 AM