पुणे : महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महापौरपद पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच होऊन, अखेर वानवडी भागातील नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या गळ्यात महापौर पदाची उमेदवारी पडली आहे. काँग्रेस पक्षाने उपमहापौरपदासाठी मुकारी अलगुडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी करून शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर भाजपा, मनसे व शिवसेना या तिन्ही पक्षांनी महापौर व उपमहापौर पदासाठी स्वतंत्रपणे निवडणुकीत उडी घेतली आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल यांना सव्वा वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानुसार विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येक ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या २५ फेब्रुवारीला महापालिकेच्या मुख्यसभेत महापौर व उपमहापौरांची निवड होईल. निवडणुकीमध्ये तटस्थ राहणाऱ्या मनसेने यंदा निवडणुकीत उडी घेतली आहे. युती करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपा व शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केली आहे.मनसेकडून महापौरपदासाठी वसंत मोरे यांना, तर उपमहापौर पदासाठी अस्मिता शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून महापौरपदासाठी अशोक येनपुरे यांना, तर उपमहापौरपदासाठी वर्षा तापकीर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी सचिन भगत यांना, तर उपमहापौरपदासाठी योगेश मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४, काँग्रेसचे ३०, मनसेचे २८, भाजपाचे २६, शिवसेनेचे १२, रिपाइंचे २ सदस्य आहेत. रिपाइंच्या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून काँग्रसेच्या सदस्यांनी सह्या केल्या आहेत, तर काँग्रेसच्या उपमहापौरांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सह्या केल्या आहेत. शिवसेनेला दूर ठेवत भाजपचे अर्ज -वृत्त/३हडपसरला झुकते मापमहापालिकेमध्ये सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाची संधी यंदा हडपसर भागाला देऊन सर्वाधिक झुकते माप दिले आहे. हडपसर भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैशाली बनकर, चंचला कोद्रे यांना पहिल्या अडीच वर्षांत महापौरपदाची संधी देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा हडपसर-वानवडी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशांत जगताप यांना महापौरपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील टर्ममध्ये हडपसरच्याच राजलक्ष्मी भोसले यांना ३ वर्षे महापौरपदाची संधी मिळाली होती.
महापौरपदासाठी जगताप यांचा अर्ज
By admin | Published: February 21, 2016 3:09 AM