पुणे : कामगार दिनीच विविध मागण्यांसाठी काम बंद आंदाेलन करणाऱ्या जहांगीरच्या कर्मचाऱ्यांचे आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरु हाेते. आज सकाळी 11 च्या सुमारास पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन केले. थकलेली पगारवाढ, मिळत नसलेला बोनस, कायमस्वरूपी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचारासाठी नकार, पगारी सुट्ट्या नाकारणे आशा अनेक कारणांमुळे जहांगीर हॉस्पिटलचे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे कामगार दिनीच जहांगीरच्या कर्मचाऱ्यांनी हाॅस्पिटल समाेर आंदाेलन केले. यावेळी पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेऊन साेडून दिले हाेते.
काल कामगार दिनीच जहांगीर हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले. गेल्या 14 महिन्यांपासून हाॅस्पिटल प्रशासनाकडून शाेषण हाेत असल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी केला आहे. थकलेली पगारवाढ, मिळत नसलेला बोनस, कायमस्वरूपी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचारासाठी नकार, पगारी सुट्ट्या नाकारणे असे प्रकार हाॅस्पिटल प्रशासनाकडून सुरु आहेत, असाही आराेप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाने सकारात्माक प्रतिसाद दिला असला, तरी मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय काम बंद आंदाेलन मागे घेणार नसल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदाेलनासंदर्भात हाॅस्पिटल प्रशासनाने निवेदन दिले असून या आंदाेलनाबाबत हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाॅर्ज इपेन म्हणाले, आम्ही आंदाेलकांच्या मागण्यांचा विचार करत आहाेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या या निराधार आहेत. त्याचबराेबर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काेर्टात केस सुरु असल्याने हे आंदाेलन बेकायदेशीर आहे. पुढची सुनावणी 6 मे ला असून या काळात कर्मचाऱ्यांनी आंदाेलन करणे चुकीचे आहे. कर्मचारी आंदाेलन करत असले तरी हाॅस्पिटलच्या कामावर त्याचा परिणाम झाला नाही.