लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चोपन्न वर्षांपूर्वी म्हणजे १४ ऑगस्ट १९६६ या रविवारच्या सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८.३० वाजता एक नाटक रंगमंचावर सादर झालं ‘संगीत जय जय गौरी शंकर’. ‘ललितकलादर्शन’ची ही कलाकृती अजरामर ठरली. या नाटकाचे निर्माते नाट्यतपस्वी भालचंद्र उर्फ अण्णा पेंढारकर यांचे जन्मशताब्दी वर्ष, ‘ ललितकलादर्श’चा स्थापना दिन (१ जानेवारी १९०८) आणि नाटकाचे लेखक विद्याधर गोखले यांचा जन्मदिन (४ जानेवारी) असा योग जुळवत हेच नाटक यंदा पुन्हा सादर होणार आहे.
‘जय जय गौरी शंकर’ या नाटकाचे चित्रिकरण ८० च्या दशकात झाले होते. त्या मूळ संचातील नाटकाच्या संपूर्ण तीन अंकांचे चित्रण यू-ट्यूबच्या माध्यमातून रसिकांसमोर आणले जाणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करीत येत्या रविवारी (दि. ३) नाटकाचे तीन प्रयोग होणार असून, पहिला अंक सकाळी ९ ला, दुसरा दुपारी ३ ला आणि तिसरा अंक संध्याकाळी ८.३० वाजता पाहायला मिळणार आहे.
गोव्याच्या मंगेशीच्या देवळात १९६६ साली सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरच्या हस्ते ‘जय जय गौरीशंकर’ या नाटकाचा मुहूर्त झाला होता. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार, जयश्री शेजवाडकर यांसह आणखी तीन सहकलाकारांच्या सोबत जेष्ठ नाटककार विद्याधर गोखले लिखित या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. नाटकाचे दिग्दर्शक होते, नटवर्य मामा पेंडसे तर संगीत दिग्दर्शक होते ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई.
तीन-चार महिन्यांच्या तालमीनंतर १४ ऑगस्ट १९६६ रोजी ‘जय जय गौरीशंकर’चा पहिला प्रयोग भालचंद्र पेंढारकरांच्या संस्थेने बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. त्याकाळी या नाटकाचे सुमारे अडीच हजार प्रयोग झाले. हाही संगीत रंगभूमीवरचा एक विक्रमच ठरला. सध्या हे नाटक आर्यदुर्गा क्रीएशन मुंबई तर्फे सादर केले जात आहे.
नादब्रह्म तर्फे पं. मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर आणि ‘जाई काजळ’ चे निर्माते राजेश गाडगीळ च्या सहकार्याने हे नाटक भालचंद्र पेंढारकर, विद्याधर गोखले आणि पं. राम मराठे यांच्या स्मृतीला वंदन करून रसिकांच्या चरणी अर्पण केले जाणार आहे. या चित्रणासोबत या नाटकाशी संबंधित जेष्ठ गायक नट प्रसाद सावकार, चंदू डेगवेकर, माया जाधव, शहाजी काळे, शुभदा दादरकर, सुधीर ठाकूर आदी कलाकारांच्या नाट्यनिर्मितीच्या आठवणी-किस्से देखील ऐकायला मिळणार आहेत.
चौकट
‘जय जय गौरी शंकर’ हे १९६६ मधील संगीत नाटक आहे. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे नसले तरी माझ्याकडे १९८२ सालचे या नाटकाचे व्हिडीओ चित्रीकरण होते. त्यावेळी साडेचार तास नाटक सादर केले जायचे. हा व्हिडीओ चांगला पॉलिश करून त्याला काही प्रोमो जोडले. येत्या ३ जानेवारीला हे तीन अंकी नाटक आम्ही यूट्यूबवर सादर करीत आहोत.”
- पं. मुकुंद मराठे.