पुणे : ‘जयहिंद.. पुणे शहर पोलीसांतर्फे स्वागत...’ अशी सुरुवात पोलिसांच्या आणीबाणीसाठी असलेल्या १०० क्रमांकावर सुरू झाल्याने चेष्टामस्करीसाठी फोन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दररोज २५ ते ३० हजार कॉल येत होते़ आता त्यांची संख्या एकदम १ हजार ते दीड हजारांपर्यंत कमी झाली़ त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष खरंच मदतीची गरज आहे, त्यांना तातडीने मदत मिळणे शक्य होऊ लागले आहे़पुणे पोलिसांनी १०० नंबर डायल कार्यप्रणालीला इंटरअॅक्टिव्ह रिस्पॉन्स सिस्टीम बसविल्यामुळे अनावश्यक फोनच्या संख्येत मोठी घट झाली आहे़ त्याचबरोबर इतक्या प्रचंड संख्येने येणारे अनावश्यक कॉल बंद झाल्याने नियंत्रण कक्षातील कर्मचाºयांवरील ताणही कमी झाला आहे़ पोलीस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक डुंबरे यांनी सांगितले, की १०० क्रमांक हा मोफत आहे. काही जण मुद्दाम रात्री-अपरात्री कॉल लावून काहीही न बोलता तसाच हातात धरून ठेवत़ ब्लॅँक कॉलची संख्या १४ ते १५ हजार होती़ काही जण कॉल केल्यावर रिंग वाजली की फोन ठेवून देत़ अशा मिस्ड कॉलची संख्या त्याच्याखालोखाल होती़ ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, अशा कॉलची संख्या सुमारे ५०० च्या आसपास असते़ हे लक्षात घेऊन पोलिसांनी ही यंत्रणा सुरू केली.कशी चालते ही सिस्टीम...या सिस्टीमनुसार जेव्हा नागरिक १०० नंबरवर फोन करतील तेव्हा त्यांना प्रथम ‘जयहिंद पुणे पोलीस कृपया आपल्या मदतीसाठी एक दाबा’ असे हिंदी, इंग्रजी व मराठीतून ऐकविले जाते़ त्याप्रमाणे नागरिकांनी कार्यवाही केल्यावर त्यांचा कॉल १०० नंबरला जोडला जाऊन त्यांना तत्काळ मदत पुरविली जाते़ तसेच त्यांना योग्य मदत मिळाली व त्यांचे समाधान झाले किंवा नाही याचा पाठपुरावासुद्धा नियंत्रण कक्ष अधिकाºयांकडून घेतला जातो़या सिस्टीममुळे अनावश्यक कॉल करणारे जयहिंद हा शब्द ऐकल्यानंतर पुढे कॉल चालू ठेवत नाहीत, असे लक्षात आले़ त्यामुळे कॉलच्या संख्येत मोठी घट झाली़ही कार्यप्रणाली यशस्वीपणे राबविण्यासाठी पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त दीपक डुंबरे, अभियान संस्थेचे वैभव गिव्हरे, सारंग पंडित, दीपक सापटे, नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी आश्लेषा माने, माधुरी अनमुले व स्नेहल केकडे यांनी परिश्रम घेतले़अश्लील संभाषण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखलनियंत्रण कक्षाला रात्री-अपरात्री फोन करून तेथे नेमणुकीस असलेल्या महिला कर्मचाºयांशी असभ्य व अश्लील भाषेत संभाषण करणाºया चौघांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जे नागरिक अथवा त्यांची लहान मुले विनाकारण १०० नंबरला फोन करून मिस कॉल देत होते, त्यांनाही त्यांच्या फोनवर फोन करून पोलिसांनी समज दिली आहे़
‘जयहिंद’च्या स्वागताने पोलिसांचा त्रास कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 3:36 AM