विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे.
येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वातंत्र्यलढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढाऱ्यांनी या कारागृहांमध्ये शिक्षा भोगली आहे. त्या अनुषंगाने संबंधित कोठड्यांचे जतन करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी काराग-ह पर्यटन उपयुक्त ठरु शकते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी ‘लोकमत’ला दिली.
विद्यार्थ्यांच्या सहली, सर्वसामान्य नागरिकांना जेलयात्रेची परवानगी दिली जाणार असल्याचे रामानंद यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, तुरुंगांमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक ठेवा आहे. तो नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी कारागृह प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून तो राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळताच ही योजना सर्वप्रथम पुणे, नाशिक रोड आणि ठाणे कारागृहात राबविण्यात येणार आहे.
चौकट
तुरुंगांचे ऐतिहासिक मोल
१) नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह : साने गुरुजी सन १९३२ मध्ये या ठिकाणी अटकेत होते. ‘खरा तो एकची धर्म’ या कवितेचे तसेच मराठीतील अजरामर साहित्यात नोंद असलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखन सानेगुरुजींनी याच कारागृहात केले. त्यांच्या नावे येथे कक्ष करण्यात आला आहे.
३) ठाणे कारागृह : क्रांतीकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशकात इंग्रज अधिकारी जॅकसन याची हत्या केली. त्यांच्यासह कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना या कारागृहात १९ एप्रिल १९१० रोजी फाशी देण्यात आली.
चौकट
ऐतिहासिक आठवणींची खाण : येरवडा कारागृह
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक ‘पुणे करार’ पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेथे झाला त्याला ‘गांधी यार्ड’ असे नाव देण्यात आले असून तत्कालीन संदर्भांचे जतन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांची कोठडी येथे आहे. बँरीस्टर मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडु, वल्ल्भभाई पटेल, सुभाषचंद्र बोस येथे अटकेत होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यार्डही येथे आहे. बाळासाहेब ठाकरे या तुरुंगात होते.