पुणे : जैन धर्मियांच्या चातुर्मासानिमित्त शहरातील विविध मंदिरे आणि स्थानकांमध्ये सोमवारी (दि. ३०) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने चातुर्मासार्थ वास्तव्यास असलेल्या साधु-साध्वींना निरोप देण्यात आला.
आषाढ महिन्याच्या चतुर्दशीला सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिक पोर्णिमेला समाप्ती झाली. यंदा अधिक मासामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा झाला. मात्र कोरोनामुळे सामुहिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने नेहमीप्रमाणे प्रवचनादी कार्यक्रम झाले नाहीत. दीपावलीनंतर निर्बंध शिथिल झाल्याने काही प्रमाणात ज्ञानपंचमीचा कार्यक्रम झाला. त्या पाठोपाठ चातुर्मास समाप्तीचा कार्यक्रम सोमवारी झाला.
चातुर्मास समाप्तीनंतर पालिताना येथील शत्रुंजय या तीर्थक्षेत्राच्या परिक्रमेला सुरूवात होते. विविध कारणास्तव अनेकजण ही तीर्थयात्रा करू शकत नाहीत त्यामुळे सर्व मंदिरांमध्ये शत्रुंजय तीर्थक्षेत्राचे भव्य चित्र लावून भावयात्रा घडवण्यात आली. त्याचा लाभ घेण्यासाठी सायंकाळी भाविकांनी मंदिरांमध्ये सहकुटुंब गर्दी केली.
तत्पुर्वी, सकाळी स्थानक आणि मंदिरांमध्ये साधु-साध्वींचे प्रवचन झाले. या निरोपाच्या प्रवचनास गर्दी झाली होती. उद्यापासुन त्यांच्या पायी विहाराला समाजाकडून शुभेच्छांसह परवानगी देण्यात आली. याशिवाय, बाराव्या शतकातील प्रख्यात आचार्य हेमचंद्रजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे पुजन श्रुतभवन येथे करण्यात आले.