जीवनात जो स्वत:साठी जगतो त्याला मरण येते, आणि जो सदैव दुस-यांसाठी आयुष्य वेचतो तो अमर असतो. जैन समाजासह गोरगरीब, दीनदुबळ्यांचा आधारवड असणारे जगविख्यात उद्योगपती रसिकलालजी धारिवाल यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे.असंख्य लोकांना लढण्यासाठी बळ देणारे रसिकलालजी सर्वांसाठी अमर राहतील. त्यांच्या कार्याचा उजाळा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली. शून्यातून विश्व निर्माण करणे, हा शब्दप्रयोग ख-या अर्थाने त्यांना लागू होतो. घोड नदीसारख्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. नियतीने शेतीवाडी हिरावून घेतल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. वडिलांच्या मार्गदर्शनाने वाटचाल करताना सुरुवातीच्या काळात स्टेशनरीचे दुकान सुरू केले. सायकवरून सुरूझालेल्या या वाटचालीने हळूहळू गती घेण्यास सुरुवात केली. स्टेशनरीचे दुकान असले, तरी तन-मन लावून अर्थात करेल ते शंभर टक्के हा त्यांचा आग्रह म्हणूनच व्यवसायात प्रगती झाली. मृदुवाणीने त्यांनी ग्राहकांची मने जिंंकली.त्यानंतर तंबाखूच्या व्यवसायात पदार्पण केल्यानंतरही त्यांनी कधीच तडजोड केली नाही. उत्पादनाचा दर्जा राखण्याचा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा म्हणून त्यांनी गरुडझेप घेतली आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. व्यवसायात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाल्यानंतर ‘धारिवाल’ नावाचे वलय निर्माण झाले. पण, या प्रसिद्धीमुळे ते कधीच हुरळून गेले नाहीत. ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले त्या समाजासाठी त्यांच्या हाताची ओंजळ कायमच खुली असायची. मग ते सामाजिक, धार्मिक असो अथवा शैक्षणिक आणि इतर सामाजिक कार्य असो. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी वैद्यकीय महाविद्यालये आपल्या आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. ज्यांना लाखो रुपये खर्च करुन शस्त्रक्रियेसाठी उपचार शक्यच नव्हते त्यांच्यासाठी रसिकलालजी देवदूतच बनले. हजारो गोरगरीब रुग्णांना त्यांच्यामुळे पुनर्जन्म मिळाला, त्याचप्रमाणे हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानज्योत चेतवली. कोणतेही मंदिर असो अथवा शैक्षणिक मदत असो, गरजवंतांची नेमकी गरज ओळखून ते मदत करीत. त्यांच्याकडे आलेला कोणीही मोकळ्या हाताने जात नव्हता. पण, त्यांची पूर्ण परीक्षा घेऊन ते मदत करीत आणि पालकत्वाच्या नात्याने त्याला मार्गदर्शन करीत असत.जैन समाजात तर त्यांच्यासारखी व्यक्ती ‘ना भुतो न भविष्यती’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जैन समाजाची उन्नत्ती हे त्यांचे ध्येय त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत असे. समाजातील कोणताही व्यक्ती असो, त्याला कोणत्याही प्रकाराची मदत अथवा मार्गदर्शनाची गरज असो यासाठी त्यांचे एक पाऊल नेहमी पुढे असे. स्पष्टवे, दूरदृष्टी, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते.तेजस्वीपणा, स्पष्टवक्तेपणा आणि कधीही कोणाला अकारण न घाबरणारे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांना चांगल्या व्यक्तींचाच सहवास लाभत गेला. कोणतीही मदत करताना त्याचा अहंभाव अथवा अपेक्षा न बाळगता एका हाताने दान आणि दुसरा हाताचा सुवर्णस्पर्शाने आज अनेकांची आयुष्य उजळली. दुसºयाच्या आनंदात आपला आनंद आणि दुसºयाचे दु:ख आपले समजून त्यानुसार कृती करण्याच्या स्वभाववैशिष्ट यामुळे त्यांनी लाखो माणसे जोडली. त्यांच्या या वाटचालीत त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्याने त्यांना पावलोपावली साथ दिली. पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारा, दु:खात कोलमडून जाताना पुन्हा उभे करणारा हा आधारवड आज उन्मळून पडल्याने आज लाखो माणसे पोरकी झाली. पण, त्यांचे विचार, मार्गदर्शनावर पुढील वाटचाल करण्याचा संकल्प सोडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...- अभय संचेती
जैन समाजाचा आधारवड हरपला, जगविख्यात उद्योगपती रसिकलालजी धारिवाल यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झाली पोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:12 AM