शेतीकामाच्या व्यापामुळे कोरोना धास्तीतून तपासणी करण्यास नकार
लोणीभापकर : बारामती तालुक्यातील मुढाळे ग्रामपंचायत अंतर्र्गत असणाऱ्या जायपत्रे वाडी येथे घरोघरी एक व्यक्ती आजारी आहेत. मात्र, शेतीकामाच्या व्यापामुळे कोरोनाच्या धास्तीने आणि पंधरा दिवस क्वारंटाईन होण्याच्या भीतीने चाचणी करण्यास नकार देत आहेत.
ग्रामस्थांना पेरणीसह शेतीची विविध कामे आहेत. अनेकांच्या घरी दुग्धव्यवसाय आहे. दुभत्या जनावरांचा संभाळ करताना अविरत काम करावे लागते. त्यामुळे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर डोक्याला ताप होईल, जनावरे आणि शेतीची कामे कोण पाहणार? असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत. त्यातून कोरोना तपासणी न करण्याची तेथील लोकांची मानसिकता झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुढाळे अंतर्गत असणाऱ्या जायपत्रेवाडीत मागील आठवड्यात एकाच कुटुंबातील सहा जण कोरोनाबाधित झाले होते. यातील सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. घरोघरी कोणी कोरोनाबाधित कोणी नाही. स्वतंत्र जायपत्रेवाडीचा आरोग्य सर्व्हे करण्यात येणार नाही. तर संपूर्ण मुढाळे गावचा सर्व्हे करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. खोमणे यांनी दिली.
——————————————
सरपंच प्रिया वाबळे, ग्रामसेवक दवडे भाऊसाहेब, सागर वाबळे, पोलीस पाटील संतोष गायकवाड यांच्यासह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आम्ही सोमवारी (दि. ९) वाडीत सर्व घरोघरी जाऊन बघितले. तेथील सर्व लोक आजार अंगावर काढत आहेत. सर्वांना तपासणी करण्याची सूचना दिली आहे. मात्र, नागरिक ऐकत नसल्याने अखेर घरोघरी जाऊन टेस्ट करणार आहे.
नितीन जायपत्रे,
सदस्य, ग्रामपंचायत, मुढाळे